श्रेयवाद! शिवसेना म्हणते आमच्यामुळे कर्जमाफी
By Admin | Updated: June 12, 2017 13:23 IST2017-06-12T13:17:21+5:302017-06-12T13:23:42+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने रविवारी केली. पण सरकारच्या या निर्णयावरून आता श्रेयवाद सुरू होणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत.

श्रेयवाद! शिवसेना म्हणते आमच्यामुळे कर्जमाफी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12- राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने रविवारी केली. पण सरकारच्या या निर्णयावरून आता श्रेयवाद सुरू होणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत. सरसरकट कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या लढ्याला आलेलं यश अशी चर्चा सुरू असताना कर्जमाफीचं श्रेय शिवसेना स्वतःला घेण्याचे प्रयत्न करते आहे, असं बोललं जातं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश मिळाल्याचा दावा करणारी पोस्टर शिवसेनेकडून मुंबईमध्ये लावण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. असं या पोस्टरवर लिहीण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षच आंदोलनाच्या बाजूनं असल्यानं भाजपची कोंडी झाली आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला, अशी चर्चा शिवसेना गटात सुरू असल्याची माहिती मिळते आहे. आंदोलन सुरू असताना भाजपनं शिवसेनेला फारसं विश्वासात घेतलं नव्हतं. त्यावरून शिवसेनेनं मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. पण, भाजपनं त्याला फारसं महत्त्व न दिल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थापलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात सहभागी व्हावं लागलं.
आता कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून कर्जमाफीचं श्रेय घेणारी पोस्टर मुंबईत झळकवण्यात आली आहेत. अखेर सातबारा कोरा झाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ... अल्पभूधारकांना नवीन कर्जवाटप... उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश... असं शिवसेनेनं पोस्टरमध्ये नमूद केलं आहे.