तलावांचे ठाणे होणार रंगीबेरंगी

By Admin | Updated: October 20, 2016 03:51 IST2016-10-20T03:51:26+5:302016-10-20T03:51:26+5:30

ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, आता ठाण्याला एक नवी ओळख म्हणून रंगीबेरंगी चेहरा देण्याचा संकल्प ठाणे महापालिकेने केला

Thanh Thane will be colorful | तलावांचे ठाणे होणार रंगीबेरंगी

तलावांचे ठाणे होणार रंगीबेरंगी


ठाणे : ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, आता ठाण्याला एक नवी ओळख म्हणून रंगीबेरंगी चेहरा देण्याचा संकल्प ठाणे महापालिकेने केला आहे. त्यानुसार, ब्रॅण्डिंग आॅफ ठाणे ही संकल्पना प्रशासनाने पुढे आणली आहे.
या संकल्पनेनुसार शहराला नवा चेहरा मिळणार असून या माध्यमातून एक लोगो तयार करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील तलाव, निसर्ग आणि खाडी यांचा संगम असणार आहे. तो तयार करण्यासाठी आॅनलाइन स्पर्धा सुरू केली असून ५ नोव्हेंबरपर्यंत ती राहणार आहे. या स्पर्धेतून जो स्पर्धक यशस्वी होईल, त्याला एक लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. विशेष म्हणजे शहराचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी पोखरण रोड नं. १ ची प्रायोगिक तत्त्वावर निवड केल्याचेही आयुक्तांनी या वेळी सांगितले.
पहिला रंग हा अ‍ॅक्वा ब्ल्यू असणार असून उर्वरित लीफ ग्रीन आणि क्रोन येलो अशी रंगसंगती असणार आहे. यातील अ‍ॅक्वा ब्ल्यू हा रंग वापरावाच लागणार असून उर्वरित दोन रंगांपैकी कोणताही रंग वापरला जाऊ शकतो, असेही आयुक्तांनी सांगितले.
शहरातील फुटपाथ, बेंचेस, डिव्हायडर, पालिकेच्या इमारती, नाट्यगृह आदींवरदेखील या रंगांचे डिझाइन वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिला प्रयोग रुंदीकरण केलेल्या पोखरण रोड नं. १ वर केला जाणार आहे. या रस्त्यावर आता याच रंगसंगतीचे फुटपाथ, बसस्थानके, विजेचे पोल, कचरापेट्या असणार आहेत. तसेच एटीएम सेंटर, बायो टॉयलेट, विविध प्रकारचे वृक्ष, एलईडी लाइट, स्ट्रीक आॅफ गॅलरी, भिंतीवर वारली पेंटिंग आदींसह जाहिरातींचे अत्याधुनिक आणि आकर्षक फलकही असणार आहेत. त्यामुळे हाच रस्ता ठाण्याचे ब्रॅण्डिंग करणारा ठरणार आहे. यासाठी सुमारे ५ कोटींची तरतूद केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
दुसरीकडे हीच रंगसंगती नव्याने तयार होणाऱ्या गृहसंकुलांच्या ठिकाणी भिंतीवरील एका कोपऱ्यात तरी द्यावी, अशी संकल्पना असून एमसीएचआयसोबत याबाबत चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
>लोगोसाठी स्पर्धा
पालिका या रंगसंगतीचा लोगो तयार करणार आहे. त्यासाठी आॅनलाइन स्पर्धा होईल. ५ नोव्हेंबरपर्यंत ती सुरू असेल. त्यातील लोगो अंतिम करून तो ठाण्याची नवी ओळख ठरेल..ज्या स्पर्धकाचा लोगो प्रथम येईल, त्याला लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

Web Title: Thanh Thane will be colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.