ठाणे जिल्हा परिषदेच्या बोगस नियुक्तीपत्राने खळबळ
By Admin | Updated: April 13, 2015 05:20 IST2015-04-13T05:20:45+5:302015-04-13T05:20:45+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी नियुक्ती झाल्याचे बोगस नियुक्तीपत्र अहमदनगर जिल्ह्यातील एका उमेदवारास मिळाले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या बोगस नियुक्तीपत्राने खळबळ
सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी नियुक्ती झाल्याचे बोगस नियुक्तीपत्र अहमदनगर जिल्ह्यातील एका उमेदवारास मिळाले आहे. मात्र या पदांच्या रिक्तजागा भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता संबंधीत उमेदवारास नियुक्तपत्र मिळाल्याच्या वृत्ताने ठाणे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या बोगस या नियुक्तीपत्राची छायांकित पत्र व्हॉटसअॅप वर मागील दोन दिवसांपासून फिरत असल्यामुळे सर्वत्र तर्कवितर्क काढले जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘ज्युनिअर इक्झीक्युटीव इंजिनिअर’ पदासाठी नियुक्ती झाल्याचे पत्र नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील वाडझिरे गावातील उमेदवाराच्या नावचे हे बोगस नियुक्तपत्र व्हॉटसअॅप वर झळकत आहेत. या पत्रात १५ जून रोजी सर्व मुळकागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले असतानाच ६ जुलैपासून जेईओ पदी रूजू होण्याचे सूचित करून पीडब्ल्यू विभागाच्या वेस्ट झोनला नियुक्तीचे ठिकाण नमूद करण्यात आले आहे.
या नियुक्तिपत्रावर ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांच्या नावासह स्वाक्षरी असून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बलखंडे यांचे देखील नाव व स्वाक्षरी असून त्यांचे नाव चुकलेले आहे. परंतु या प्रकारचे कोणतेही नियुक्तीपत्र कोणत्याही उमेदवारास पाठवलेले नसल्याचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना नमुद केले .