ठाण्यात अति लाड पडले महागात

By Admin | Updated: April 23, 2017 02:23 IST2017-04-23T02:23:36+5:302017-04-23T02:23:36+5:30

रिक्षाचालक आणि गृहिणी असलेल्या पालकांनी प्रेमापोटी आपल्या पाल्याला ऐपत नसतानाही न्यू ब्रॅण्ड मोटारसायकल खरेदी करून दिली. पण, ती चालवण्यासाठी लागणारे

Thane was very expensive in the cottage | ठाण्यात अति लाड पडले महागात

ठाण्यात अति लाड पडले महागात

- पंकज रोडेकर,  ठाणे

रिक्षाचालक आणि गृहिणी असलेल्या पालकांनी प्रेमापोटी आपल्या पाल्याला ऐपत नसतानाही न्यू ब्रॅण्ड मोटारसायकल खरेदी करून दिली. पण, ती चालवण्यासाठी लागणारे पेट्रोलचे (इंधन) पैसे त्याच्याकडे नसल्याने त्याने मित्राच्या मदतीने जबरदस्तीने पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. नेमकी ती महिला पोलीस निघाली आणि तिच्या प्रसंगावधानाने चोरीचा प्रयत्न फसला. त्यामुळे दोन्ही मित्रांवर पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.
ठाण्याच्या लोकमान्यनगर परिसरातील गरीब पालकांनी उमेशला (नाव बदलले) चारपाच महिन्यांपूर्वीच मोटारसायकल घेऊन दिली होती. पहिले काही महिने उमेशचे मोटारसायकल चालवताना चांगले गेले. त्यातच, तो गेल्या आठ दिवसांपूर्वी भिवंडी, काल्हेर येथे कामाला लागला होता. कामाला जाण्यासाठी तो नव्याकोऱ्या मोटारसायकलचा वापर क रीत असे. पण, येथे येण्या-जाण्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलसाठी त्याला पैशांची चणचण भासू लागली. तो आठ दिवसांपूर्वीच कामाला लागल्याने तेथील पगार मिळण्यासाठी काही दिवसांचा अवधी असल्याने पेट्रोल टाकण्यासाठी पैसे आणायचे कु ठून, हा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. त्याचदरम्यान, ‘धूम’ स्टाइलने मोबाइल चोरण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. पण, एकट्याने चोरी करणे शक्य नसल्याने त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या प्रदीप (नाव बदलले आहे) या मित्राला तयार केले. त्यातच, ते दोघे रात्री पावणे दहाच्या सुमारास घोडबंदर रोडने जाताना त्यांना एक महिला मोबाइलवर बोलत रस्त्याने एकटी जाताना दिसली आणि त्यांनी तिचा मोबाइल खेचण्याचा प्रयत्न केला. पण, तो फसला. दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी न्यायालयाने भिवंडीतील बालसुधारगृहात केली असून, ती गाडीही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाल्याचे लाड पुरवताना नाकीनऊ येणाऱ्या पालकांनो जरा सावधान... असेच म्हणण्याची वेळ ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे आली आहे.

असे फसले दोघे
हा प्रकार घडला, तेव्हा प्रदीप मोटारसायकल चालवत होता. तर, उमेशने महिलेचा मोबाइल खेचण्याचा प्रयत्न केला. पण, तक्रारदार या पोलीस असल्याने त्यांनी तातडीने त्या मोटारसायकलचा नंबर नोट केला. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांची ओळख पुढे आली आणि ते फसले.

प्रदीप अकरावीचा विद्यार्थी
प्रदीप हा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून, शिक्षणासाठी अहमदनगरला राहत होता. परीक्षा संपल्याने तो ठाण्यात मोठ्या भावाकडे काही दिवसांपूर्वी आला होता. त्यातच त्याच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी न्यायालयाने भिवंडीतील बालसुधारगृहात केली असून, ती गाडीही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करावा. त्यांचे लाड पुरवताना त्यांच्या बारीकसारीक गोष्टींकडेही कानाडोळा करू नये.
- गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चितळसर-मानपाडा पोलीस ठाणे

Web Title: Thane was very expensive in the cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.