ठाण्यात दोन तरुणींनी धावत्या रिक्षेतून मारली उडी
By Admin | Updated: March 2, 2015 10:56 IST2015-03-02T10:46:03+5:302015-03-02T10:56:30+5:30
ठाणे येथे प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या दोघा तरुणींनी धावत्या रिक्षेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.

ठाण्यात दोन तरुणींनी धावत्या रिक्षेतून मारली उडी
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २ - ठाणे येथे प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या दोघा तरुणींनी धावत्या रिक्षेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे.
भिवंडीतील नातेवाईकाकडे आलेल्या दोन तरुणी रविवारी ठाण्यात फिरायला आल्या होत्या. ठाण्यात भ्रमंती केल्यावर संध्याकाळी दोघीही रिक्षेने भिवंडीकडे परतत होत्या. प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने दोघींसमोर अश्लील हावभाव केले. दोघींनीही रिक्षा चालकाला रिक्षा थांबवायला सांगितली. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता आणखी वेगाने रिक्षा पळवायला सुरुवात केली. या घटनेमुळे घाबरलेल्या दोघींनीही कॅडबरी उड्डाणपुलाजवळ धावत्या रिक्षेतून उडी मारली. याच मार्गावरुन जाणा-या एका महिलेला दोघी तरुणी जखमी अवस्थेत आढळल्या व हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी अज्ञात रिक्षााचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून रिक्षाचालकाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी ठाण्यातच स्वप्नाली लाड या तरुणीनेही रिक्षा चालकापासून जीव वाचवण्यासाठी धावत्या रिक्षेतून उडी मारली होती. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी मुजोर रिक्षाचालकांवर वचक निर्माण करु अशी गर्जना केली होती. मात्र रविवारी पुन्हा एकदा रिक्षाचालकापासून सुटका करण्यासाठी दोघा तरुणींना धावत्या रिक्षेतून उडी मारावी लागल्याने ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.