भिवंडीतील वाद नवी मुंबईत
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी नवी मुंबई बाहेरील नेत्याने भव्य मोर्चा काढला. त्यानंतर नामकरणासाठी स्थापन झालेल्या समितीची बैठक पार पडली. यावेळी खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यात मतभेद पाहावयास मिळाले. बाळ्यामामांनी आंदोलन तीव्र करण्याची भूमिका मांडली. मात्र, यासाठी शांततेचा मार्ग योग्य असल्याचे पाटील यांनी सांगताच दोन्ही नेत्यात शाब्दिक चकमक घडली. त्यामुळेच भिवंडीतील वाद नवी मुंबईपर्यंत पोहचला की काय, असा प्रश्न उपस्थितांना पडला नसेल तर नवल.
दूर ठेवले की मुद्दाम टाळले?
जीएसटी स्लॅबमध्ये झालेल्या बदलामुळे होणाऱ्या फायद्याची व्यापाऱ्यांसह ग्राहकांना भाजपाकडून ठिकठिकाणी माहिती देण्यात येत आहे. याच अंतर्गत नवी मुंबईत जीएसटीचा जागर करण्यासाठी भाजपाचे चार खासदार सोमवारी आले. यावेळी पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, अनिल कौशिक, विकास सोरटे आणि राजू शिंदे उपस्थित होते. ही सर्व मंडळी बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाते. यात शहरातील महत्त्वाचे नेते असलेले वनमंत्री गणेश नाईक यांचा एकही समर्थक दिसला नाही. हे चित्र नवी मुंबईसाठी ‘विचित्र’ तर ठरणार नाही ना, असाच आता प्रश्न आहे.
स्वबळ गोड पण पोकळ ठरू नये
स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे पडघम वाजताच महायुती व आघाडीतील घटकपक्ष एकत्र लढणार की स्वबळाचा झेंडा फडकवणार याकडे सर्वांचे डोळे लागले असताना खा. प्रफुल्ल पटेल यांनी मुंबई सोडून अजित पवार गट इतरत्र स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला. पालकमंत्र्यांनी दोन तासांचे पर्यटन दौरे करू नका, लोकांचे प्रश्न सोडवा, हा घरातल्या लोकांनाच उद्देशून इशारा त्यांनी दिलाय. पटेलांच्या या इशाऱ्याकडे भाषण म्हणून न बघता तो अंतर्गत नाराजीचा सूर तर नाही ना? मुंबईचे राजकीय गणित मांडताना पक्षातीलच समन्वय हरवत चाललाय का? असे तर त्यांना म्हणायचे नसेल?
हा तिखट-गोड गप्पांचा नमुना
आ. रोहित पवार, सुषमा अंधारे व अंजली दमानिया यांच्यातील शाब्दिक युद्ध रंगत आहे. पवार, अंधारे यांच्या आरोपांवर दमानिया यांनी महत्त्वाच्या कामात असल्याने वेळ नसल्याचे म्हटलेय. तर भाजपला वगळून बाकीच्यांची प्रकरणे कशी हातात येतात याचे उत्तर देण्यास त्यांना वेळ नाहीय, असा टोला अंधारेंनी लगावला. त्यावर दमानियांनी तुम्ही कुठचाच विषय लावून धरला नाही , असे प्रत्युत्तर दिले. आता अंधारेंनी पुन्हा खुसपट काढत, उत्तर द्यायला वेळ लागतो कारण सल्ले कुणाकडून येतात असे म्हणत टिप्पणी केलीय. एकंदरीत, हा वाद म्हणजे तू बोल, मी बोल अशा तिखट-गप्पांचा नमुना ठरलाय.
वडेट्टीवार यांचा सल्ला की चिमटा?
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको यासाठी गोंदिया येथे महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या मंचावरून आ. विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे आ. परिणय फुके यांचे चांगलेच चिमटे घेतले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी फुकेंनी नेतृत्व करावे, त्यांच्यासोबत आम्ही सक्षमपणे उभे राहू, मुख्यमंत्र्यांना त्यांनी यासाठी पत्र लिहावे, असा थेट सल्ला मंचावर फुके यांना दिला. वडेट्टीवार यांच्या भाषणानंतर हा फुके यांना सल्ला होता की त्यांनी चिमटे काढले याचीच चर्चा आंदोलनस्थळी होती.
आता दहापट मोठे स्टेज हवे होते !
नाशिकमध्ये ‘नमो युवा रन’ कार्यक्रम पार पडला. निवडणुकीतील इच्छुकांना उपक्रमासाठी अधिकाधिक युवक आणण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक इच्छुक किती युवक आणले, ते दाखवण्यासाठी स्टेजवर जाण्याचा खटाटोप करीत होता. परिणामी गर्दीमुळे गिरीश महाजन जणू हरवून गेले. भाऊ दिसेनात हे पाहून स्टेजखाली उभा असलेला कार्यकर्ता म्हणाला भाऊ स्टेजवर आहेत की नाहीत? त्यावर दुसरा म्हणाला खरे तर त्यांनी मान्यवरांसाठी एक आणि इच्छुकांसाठी त्यापेक्षा दहापट मोठे स्टेज ठेवायला हवे होते. या मल्लिनाथीवर गर्दीतही हास्याची कारंजी उसळली.
आता कशी नेत्यांना आली जाग?
ठाण्यातील घोडबंदर सेवा रस्ता विलीनीकरण येथे होणारी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या विरोधात नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले. सत्तेत असलेल्या नेत्यांना येथील नागरिकांच्या समस्यांची जाण झाली. याआधी भाजपचे आ. संजय केळकर यांनी येथील रहिवाशांची बैठक घेत आंदोलनात उडी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही समस्या सोडविण्यासाठी अवजड वाहतुकबंदीचे निर्देश दिले. उद्धवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनीही यामध्ये उडी घेतली. एकूणच जनता रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का, असाच आता प्रश्न आहे.
मुंडे यांनी काय विचार केला?
सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी तटकरे यांचे कौतुक केले आणि भाषणाच्या शेवटी इच्छा ओठांवर आली. ‘माझ्या हाताला काहीतरी काम द्या, चुकलो तर कान धरा, पण आम्हाला रिकामे ठेवू नका, जबाबदारी द्या’, असे मुंडे यांनी म्हटले. राज्य मंत्रिमंडळातून मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी मंत्रीपद मिळालेल्या छगन भुजबळ यांनी ‘आपल्याकडे त्यांच्यासाठी एक काम आहे, त्यांनी ओबीसी लढ्यात सहभागी होऊन त्यांच्या हक्कांचे जतन करावे’ असे सांगितले. आपल्याच सहकाऱ्याच्या या प्रतिक्रियेवर मुंडे यांना काय बोलावे हे कळेनासे झाले.