मुंबई : राज्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या पाच हजार ४९२ इतकी आहे. या रुग्णांपैकी दारिद्य्ररेषेखालील आणि गरीब रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात येत आहेत. तर, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत महत्त्वाच्या महागड्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले. मुंबईसह राज्यात थेलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबाबतचा मुद्दा जगन्नाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, थॅलेसेमियाचे पाच हजार ४९२ रुग्ण असून मुंबई, ठाणे आणि ग्रामीण भागात एक हजार ७७७ रुग्ण आहेत. हा आजार अनुवांशिक असून आदिवासी, पंजाबी, सिंधी, मारवाडी, कुणबी आणि मुस्लीम समाजामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ होत असून यातील ४० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे मुंबईत आहेत, असे सावंत यांनी सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती या चार ठिकाणी डे केअर सेंटर अंतर्गत हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल अँनिमिया या आजारांचे निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते, अशी माहितीही सावंत यांनी दिली. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयामधून या रोगाबाबतची जनजागृती करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. निरंजन डावखरे, अनिल तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. (प्रतिनिधी)आकृतीबंधातील रिक्त पदे चार महिन्यात भरणारआकृतीबंधातील डॉक्टरांची रिक्त पदे चार महिन्यांत भरण्यात येतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. यासंदभार्तील प्रश्न हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता. नाशिकमधीलभारम प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खिर्डीसाठे व भुलेगाव उपकेंद्रांची बांधकामे पूर्ण झाली. त्यासाठी पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सावंत यांनी सांगितले. आकृतीबंधातील एक हजार ६९२ एकत्रित पदांचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. चार महिन्यांत भरण्यात येतील, असेही ते म्हणाले. ७५ टक्के बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांच्या पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येतात. त्यांच्या अहवालानंतर निर्णय घेतला जातो, असेही सावंत म्हणाले. नारायण राणे, सुनिल तटकरे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
थॅलेसेमियाचे ५,५०० रुग्ण
By admin | Updated: July 26, 2016 02:10 IST