खंडपीठासाठी शिवसैनिकांचे ठाकरेंना साकडे
By Admin | Updated: February 7, 2015 00:10 IST2015-02-06T22:44:42+5:302015-02-07T00:10:34+5:30
या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० हजार केसेसे उच्च न्यायालयात प्रलंबित असून, वकील व पक्षकार यांचा विचार करता जवळपास दीड कोटी जनतेचा प्रश्न आहे.

खंडपीठासाठी शिवसैनिकांचे ठाकरेंना साकडे
सातारा : ‘सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ लवकरच होईल. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे,’ अशी माहिती शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली.कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या बार असोसिएशनच्या सर्व अध्यक्ष व कृती समितीच्या सदस्यांनी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज(शुक्रवारी) भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठासाठी मागणी करून चर्चा केली.या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० हजार केसेसे उच्च न्यायालयात प्रलंबित असून, वकील व पक्षकार यांचा विचार करता जवळपास दीड कोटी जनतेचा प्रश्न आहे. प्रत्येकाला मुंबई येथील हायकोर्टात यावे लागते. त्यामुळे जनतेचा पैसा, वेळ वाया जात असून, त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यंत आवश्यक आहे, असे कृती समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सातारा जिल्हाप्रमुख हर्षल कदम, जिल्हा उपप्रमुख अजिंक्य पाटील, तालुकाप्रमुख अनिल शेटे यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. कोल्हापूर खंडपीठ मागणी कृती समितीचे अध्यक्ष विवेक घाडगे, सांगली बार असोसिएशन महेश जाधव, ईश्वरपूरचे अॅड. फिरोज मगदूम, प्रमोद भोकरे, उमेश माणकापुरे, दीपक शिंदे, शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार संजय इंजे, अभिजित गार्डे, राजू चौगुले, अमोल चिमण्णा, भालचंद्र मोकाशी, संतोष पाटील, सागर मलगुंडे तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी व वकीलही हजर होते. (प्रतिनिधी)