Thackeray Group Chandrakant Khaire News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. यातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. यातून ठाकरे गट आता पुन्हा एकदा भावनिक आवाहनाचे राजकारण करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या सभेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आणि पक्ष न सोडण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर भर मंचावर चंद्रकांत खैरे हे कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक झाल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेही यावेळी या मेळाव्याला उपस्थित होते.
कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका
कुठेही जाऊ नका. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका. मी हात जोडून विनंती करतो. तुम्हाला इथे दंडवत घालतो. उद्धव ठाकरेंकडे आपल्याला पाहायचे आहे. परवाच्या कार्यक्रमात ते किती कळकळून बोलले. तुम्हाला विनंती करतो, कुठेही सोडून जाऊ नका. एकत्र मिळून काम करू. माझे काही चुकले तर मला बोललात तरी हरकत नाही. माझी विनंती अशी आहे की थांबा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून येऊ, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबळावर लढून एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.