Sanjay Raut News: आताच्या घडीला राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. बीड, परभणी, औरंजेबची कबर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतची विधाने, दिशा सालियन प्रकरण, नागपूर हिंसाचार, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच गौप्यस्फोटांची मालिकाही सुरूच आहे. भाजपा आणि शिवसेना या पक्षांची युती तुटण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे.
दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती तुटली आणि नवी समीकरणे राज्याच्या राजकारणात उदयास आली. अशातच भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गौप्यस्फोट करत केवळ चार जागांच्या वादामुळे युती तुटल्याचा दावा केला आहे. यानंतर संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली.
भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, २०१४ साली भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. त्यांना युती तोडायची होती. ते तसे ठरवूनच आले होते. इथे केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि शिवसेना संपवावी, असा भाजपाचा हेतू होता. १४७ व १५१ जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा चालू होती. मी प्रामाणिकपणे सांगतो की, देवेंद्र फडणवीस हे तेव्हा युती तोडण्याच्या विरोधात होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठांनीच युती तोडली, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, २०१४ साली आमचा तेव्हाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू होती. आम्ही त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा देण्यास तयार झालो होतो. पण त्यांनी मनात एक आकडा ठरवला होता. आम्ही त्यांना १४७ जागा द्यायला तयार झालो होतो, आम्ही १२७ जागा लढवणार होतो आणि इतर जागा अन्य मित्रपक्षांना द्यायच्या होत्या. पण ते १५१ जागांवर अडून राहिले. त्यानंतर आम्ही ठरवले की, १४७-१२७ हा फॉर्म्युला मान्य असेल तरच शिवसेनेसोबत युती करायची. हा फॉर्म्युला मान्य असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, अन्यथा युती होऊ शकणार नाही, असा अल्टिमेटम आम्ही शिवसेनेला दिला होता. तुमचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल, असेही सांगितले होते. पण विधात्याच्या मनात मला मुख्यमंत्री करण्याचे असेल. शिवसेनेने सांगितले की, आमच्या युवराजांनी १५१ जागांची घोषणा केली. शिवसेना तेव्हा कौरवांच्या मूडमध्ये होती की आम्ही पाच गावेही देणार नाहीत. ते कौरवांच्या भूमिकेत गेल्यानंतर आम्हीही सांगितले की आमच्याकडेही श्रीकृष्ण आहेत, आम्हीही लढाई लढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.