Thackeray Group Criticized MNS: गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तर, हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावरून मनसे आक्रमक झाली असून, राजकीय वर्तुळातील काही पक्षांकडून मनसेवर टीका केली जात आहे.
शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, उत्तर भारतीयांविरोधातील हिंसेला राज ठाकरे पाठिंबा देत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरील कारवाईसंदर्भात निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. मनसेची मान्यता रद्द करावी, यासाठी कुणीतही उत्तर भारतीय म्हणे न्यायालयात गेला आहे. मराठी प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या षड्यंत्रामागे भाजप आहे, असे मनसे संदीप देशपांडे म्हणाले. यावरून आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मनसेवर बोचरी टीका केली आहे.
मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना
मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना. जेवढी चावी भराल तेवढीच चालेल. कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालणार आहे संघटन आहे. शोबाजी करण्यासाठी एखाद्या बँकेत जाऊन एखाद्याच्या कानाखाली मारणे. गंगेत जाऊन तुम्ही उभे राहिले म्हणजे गंगा स्वच्छ होईल असे नाही. हे सर्व विषय आहेत मात्र याची प्रॅक्टिकली सुरुवात असायला हवी. हे सरकार कोणाचे आहे, ते आपल्याला माहिती आहे. या सरकार विषयी मनसेची भूमिका काय हेही आपल्याला माहिती आहे. राजकीय पक्ष म्हणून राजकीय भूमिका घ्यावी लागते परंतु हे राजकीय भूमिका घेताना आज वेगळी, उद्या वेगळी, परवा वेगळी अशी मनसेची सातत्याने भूमिका आहे. त्यामुळे असे शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना संधी दिलेली आहे. मुंबई ही मराठी भाषिकांचीही आहेच. मराठी बोलले पाहिजे हे ठीक आहे. दक्षिण भारतातील किंवा उत्तर भारतातील युवावर्ग चांगल्या पद्धतीने मराठीत बोलतात. बँकेत जाऊन तुम्ही म्हणाल की, हे सगळे करा, तर ही भूमिका अयोग्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी इकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे केंद्रीय नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे.