‘युवा’मुळे टळली ठाकरे बंधूंची भेट
By Admin | Updated: August 10, 2015 01:30 IST2015-08-10T01:30:48+5:302015-08-10T01:30:48+5:30
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘भरतभेट’ युवासेनेच्या

‘युवा’मुळे टळली ठाकरे बंधूंची भेट
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘भरतभेट’ युवासेनेच्या ‘बाल’हट्टामुळे टळल्याची चर्चा आहे. मनसेसोबत कोणताही राजकीय समझोता करण्यास युवासैनिकांचा ठाम विरोध असल्याचे कळते. ठाकरे बंधूंच्या कथित भेटीचे वृत्त ‘व्हायरल’ होताच उद्धव यांनी भेटीबाबतच्या वृत्ताचा तातडीने इन्कार केला, मात्र मनसेकडून सोईस्कर मौन पाळले गेले.
उद्धव व राज यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे खंडित झालेला संवाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने युती तोडल्यानंतर सुरू झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तिथीपूर्वी उभयतांची भेटही ठरली होती. ‘मातोश्री’वरून भेटीचा सांगावा येताच राज यांनी मनसे उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबविले होते. पण ऐनवेळी कुठेतरी माशी शिंकली आणि संभाव्य शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेवर पाणी पडले. टळलेल्या ‘त्या’ भेटीचे रहस्योद्घाटन स्वत: राज यांनीच नंतर माध्यमांसमोर केले होते.
राज्यात सत्तांतर घडून भाजपा प्रणीत सरकार आल्यानंतर सगळेच राजकीय संदर्भ बदलले. रडतखडत शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तरी भाजपाकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे सेनेची अजूनही तळ्यात-मळ्यात भूमिका आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सेनेसोबतची युती तोडून स्थानिक ताराराणी आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची भाजपाने तयारी केली आहे. त्यामुळे उद्धव व राज एकत्र येऊन भाजपाचा मुकाबला करणार या चर्चेला जोर आला. त्यातूनच या दोघांची कर्जतमध्ये भेट झाल्याच्या चर्चेला ऊत आला. मात्र या कथित भेटीचा उद्धव यांनी ठामइन्कार केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, उद्धव व राज यांच्या भेटीचे वृत्त देऊन राजकीय गैरसमज पसरवून गोंधळ निर्माण केला जात आहे. मात्र अशी गुप्त भेट व राजकीय खलबते झालेली नाही. शिवसेना स्वतंत्र बाण्याचा पक्ष असून, गुप्त खलबते करण्यावर आमचा विश्वास नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका शाळांमध्ये टॅब वाटपाच्या आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेला मनसेने विरोध दर्शविला होता. त्यामुळे मनसेसोबत कोणताही राजकीय समझोता
नको, अशी ठाम भूमिका युवासेनेकडून घेतली गेल्याचे कळते.
(विशेष प्रतिनिधी)