तीनशे रुपयांत बनावट आधारकार्ड

By Admin | Updated: August 2, 2016 02:08 IST2016-08-02T02:08:34+5:302016-08-02T02:08:34+5:30

बनावट कागदपत्रे तयार करुन या पुराव्याच्या आधारावर बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या तीन जणांना चेंबूर पोलिसांनी अटक केली.

Textured base card for Rs | तीनशे रुपयांत बनावट आधारकार्ड

तीनशे रुपयांत बनावट आधारकार्ड


मुंबई: बनावट कागदपत्रे तयार करुन या पुराव्याच्या आधारावर बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या तीन जणांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी अशाच प्रकारे ५०० ते ६०० जणांना बनावट आधारकार्ड बनवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
वाढत्या गुन्हेगारीसोबतच दहशदवादी कारवायांना आळा घालण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकातील अधिकारी संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवून असतात. अशाच प्रकारे चेंबूर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी चार दिवसांपूर्वी भक्ती पार्क परिसरातील सीम कार्ड मिळणाऱ्या दुकानात गेले होते. याठिकाणी काही ग्राहकांनी सीम कार्ड देण्यासाठी कागदपत्रे दिली होती. अधिकारी ही कागदपत्रे तपासत असताना त्यांना एक आधारकार्ड संशयास्पद वाटले. त्यांनी तत्काळ या आधारकार्डधारकाची विचारपूस केली असता, दुकानाच्या बाजूलाच असलेल्या एका सलूनमधील शब्बीर अल्ली (२३) तरुणाचे ते आधारकार्ड असल्याचे दुकानदाराने सांगितले. पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, हे आधारकार्ड केवळ तीनशे रुपयात त्याला पंडित यादव (४४) या आरोपीने बनवून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी नेहरु नगर परिसरातून पंडितला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ पोलिसांना एक डायरी देखील आढळून आली. त्यात त्याने आत्तापर्यंत अशाच प्रकारे ६०० जणांना बनावट आधारकार्ड बनवून दिल्याची नोंद आहे.
पोलिसांनी या आरोपीला तत्काळ अटक करत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शांताराम चव्हाण (३८) हा आरोपी त्याला बनावट कागदपत्रे तयार करुन देत असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. ज्या इसमाला आधार कार्ड हवे आहे, अशा इसमाचे नाव तो कोणाचेही रेशनकार्ड घेऊन त्या झेरॉक्सवर लावत असे. त्यानंतर ही कागदपत्रे घेऊन तो आधार कार्डचे कंत्राट मिळालेल्या दप्तेश साळुंखे (२५) या आरोपीकडे जायचा. त्याला ठरलेली रक्कम दिल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी न करताच तत्काळ तो त्याला हे आधारकार्ड बनवून देत असे. चेंबूर पोलिसांनी यामध्ये या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच पुरावे नसताना देखील आधारकार्ड बनवून घेणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Textured base card for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.