आरटीओचे बनावट बॅज साठा जप्त
By Admin | Updated: April 8, 2017 04:15 IST2017-04-08T04:15:47+5:302017-04-08T04:15:47+5:30
आरटीओच्या बनावट बॅज, बिल्ल्यांचा साठा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मुंब्य्रातून जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आरटीओचे बनावट बॅज साठा जप्त
ठाणे : आरटीओच्या बनावट बॅज, बिल्ल्यांचा साठा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मुंब्य्रातून जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बस, टॅक्सी तसेच रिक्षा चालक आणि वाहकांना आरटीओकडून दिल्या जाणाऱ्या बॅज, बिल्ल्यांच्या बोगस साठ्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचला. मुंब्य्रातील न्यू मुसाकासम इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका रुममध्ये आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मिलिंद पिंगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी दोन आरोपी बनावट बॅज, बिल्ले तयार करताना रंगेहाथ सापडले. चौकशी केली असता त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
साजीद अबुबकर मांडवीवाला आणि मोहम्मद सलिम इब्राहिम भूजवाला यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११३ बनावट बॅज जप्त करण्यात आले. याशिवाय बनावट बॅज तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे ४0 हजार रुपयांचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपींना १0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
६ महिन्यांपासून सुरु होता उद्योग
आरोपींचा मूळ व्यवसाय नेमप्लेट तसेच वाहनांच्या नंबरप्लेट बनवण्याचा आहे. जवळपास ६ महिन्यांपासून ते बनावट बॅज, बिल्ले तयार करून विकण्याच्या गोरखधंद्यात उतरले. एक बॅज ते सुमारे २५0 ते ३00 रुपयांमध्ये विकायचे. आतापर्यंत १00 ते १५0 चालक, वाहकांना आरोपींना बनावट बॅज, बिल्ले विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
आरटीओकडून माहिती
या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरटीओकडून आवश्यक माहिती पोलीस घेणार आहेत. चालक, वाहकांना दिले जाणारे बॅज, बिल्ले कुठून बनवले जातात, ते बनविण्याचा कुणाला अधिकृत परवाना दिला आहे का, कुणाचा बॅज अथवा बिल्ला हरवल्यास तो बाहेरून दुसरा बनवू शकतो का, अशा अनेक मुद्यांची माहिती पोलीस आरटीओकडून घेणार आहे.