पणन महासंघाच्या संकलन केंद्राकडे कापूस उत्पादक शेतक-यांनी फिरविली पाठ
By Admin | Updated: November 15, 2016 16:36 IST2016-11-15T16:36:56+5:302016-11-15T16:36:56+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित अकोला यांच्यावतीने येथील उपविभागाने १५ नोव्हेंबर रोजी कापुस संकलन केंद्राचे उद्धाटन करण्यात आले.

पणन महासंघाच्या संकलन केंद्राकडे कापूस उत्पादक शेतक-यांनी फिरविली पाठ
>ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 15 - महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित अकोला यांच्यावतीने येथील उपविभागाने १५ नोव्हेंबर रोजी कापुस संकलन केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. या उद्धाटनाच्या दिवशी संचालक मंडळाच्यावतीने काटा पूजन करुन खरेदीस प्रारंभ केला. पण याकडे एकही शेतकरी फिरकला नसल्याचे दिसून आले.
मंगरुळपीर येथील लक्ष्मी कॉटन इंडस्ट्रिज येथे १५ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या कापूस संकलन केंद्राचे रितसर उदघाटन संचालक पी.एन. गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समिती सचिव बाळऋसाहेब पाटील, एस.बी. जाजु, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पुंडलीकराव ठाकरे, एन. जी. काटुलकर, मुरलीधर बंग, सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रथम येणा-या शेतक-याची वाट पाहल्या गेली मात्र या संकलन केंद्रावर उदघाटनाच्यादिवशी कोणीही फिरकले नाही.
व्यापा-यांचा जास्त भावामुळे झाला परिणाम
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित अकोला यांच्या कापूस संकलन केंद्रावर ४१६० रुपये भाव तर व्यापा-यांच्यावतीने ५००० रुपये भाव दिल्या जात असल्याने शेतकरी संकलन केंद्रावर आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.