अतिरेक्यांच्या अफवेने रेल्वे थांबवली

By Admin | Updated: January 26, 2015 04:06 IST2015-01-26T04:06:38+5:302015-01-26T04:06:38+5:30

दिल्ली-गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी प्रथम भुसावळ स्थानकात आणि नंतर नगरमध्ये या गाडीची कसून तपासणी करण्यात आली

The terrorists' rumors stopped the train | अतिरेक्यांच्या अफवेने रेल्वे थांबवली

अतिरेक्यांच्या अफवेने रेल्वे थांबवली

भुसावळ / नगर : दिल्ली-गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी प्रथम भुसावळ स्थानकात आणि नंतर नगरमध्ये या गाडीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यामुळे यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला़
सूत्रांच्या माहितीनुसार, अप गोवा एक्स्प्रेसमध्ये पाच संशयित अतिरेकी असल्याचा दूरध्वनी खंडवा रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर लगेचच भुसावळ रेल्वे स्थानकावर सतर्कतेचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या पथकाने संपूर्ण गाडीची तपासणी केली. यात काहीही आढळून आले नाही. या वेळी डॉग स्कॉडसह बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
तर, दिल्ली-गोवा निजामोद्दिन रेल्वे एक्स्प्रेसमध्ये दिल्ली येथून चार अतिरेकी बसले आहेत, अशी माहिती इंदूर (मध्य प्रदेश) पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलिसांना कळविली. नंतर हाच संदेश दुपारी दीड वाजता नगर रेल्वे पोलिसांना मिळाला. त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणी आणि कंट्रोल रुमला याची माहिती देऊन पोलीस यंत्रणेला मदतीसाठी पाचारण केले. अवघ्या दहाच मिनिटांत सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यामुळे गाडी नगरमध्ये येण्याआधीच रेल्वे स्थानकाला पोलिसांचा गराडा पडला.
निजामोद्दीन एक्स्प्रेसची नेहमीची वेळ ही दुपारी एकची आहे. मात्र भुसावळ रेल्वे स्टेशनवर झडती घेण्यात आल्याने ही गाडी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी नगर रेल्वे स्टेशनवर आली. तब्बल सव्वा तास गाडीची झडती घेण्यात आली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The terrorists' rumors stopped the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.