अनैतिक संबंधातून वरूड येथे तिहेरी हत्याकांड
By Admin | Updated: January 25, 2015 00:56 IST2015-01-25T00:56:37+5:302015-01-25T00:56:37+5:30
विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर आरोपीने थेट स्वत:च्या घरी जाऊन त्याच्या अनैतिक

अनैतिक संबंधातून वरूड येथे तिहेरी हत्याकांड
तालुका हादरला : प्रेयसीसह दिरावर चाकूने वार, पित्यावर झाडली गोळी
वरूड (अमरावती) : विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर आरोपीने थेट स्वत:च्या घरी जाऊन त्याच्या अनैतिक संबंधांवर सतत आक्षेप घेणाऱ्या स्वत:च्या पित्याचाही गावठी पिस्तूलने गोळी झाडून खून केला.
ही घटना नजीकच्या बारगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. अनैतिक संबंधातून घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने तालुका हादरला आहे.
अंजिरा रामेश्वर उईके (२७), गोपाल बिरजू उईके (२२) व पंजाबसिंग भादा (५५) अशी या हत्याकांडातील मृतांची नावे आहेत. मनोजसिंग पंजाबसिंग भादा (२७) असे आरोपीचे नाव आहे. बारगाव येथे भादा व उईके कुटुंब शेजारी राहतात.
मृत अंजिरा उईकेचा पती २०१२ पासून बेपत्ता असल्याने अंजिरा ही सागर (१०), अमित (८) व दीर गोपाल उईकेसह येथे राहत होती. आरोपी मनोजसिंहसोबत अंजिराचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनोजसिंगचे वडील पंजाबसिंग यांना होता. त्यावरून मनोजसिंग व पंजाबसिंग या पिता-पुत्रांमध्ये सातत्याने खटके उडत होते. घटनेच्या दिवशी आरोपी मनोजसिंगने अंजिरा व तिचा दीर गोपाल यास सोबत बघितले होते. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंजिराच्या घरात चाकू घेऊन प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या अंजिरा व गोपालवर चाकूने सपासप वार केले. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. एवढ्यावरच आरोपी मनोजसिंगचा संताप शमला नाही. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्याने अंजिराचा मृतदेह फरफटत बाहेर आणला. त्यानंतर तो थेट स्वत:च्या घरी गेला आणि डुकरे मारण्याच्या गावठी पिस्तूलने गोळी झाडून त्याने त्याचे वडील पंजाबसिंग भादा यांचाही खून केला. बंदुकीच्या आवाजाने भादा कुटुंबातील सदस्य खडबडून जागे झाले. आरोपी मनोजसिंगने तिघांचा खून केल्याची घटना कळताच बारगाव हादरले. किसनसिंग भादा यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी पहाटे १ च्या सुमारास घटनास्थळ गाठून मृतदेहांचा पंचनामा केला. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा रामासामी, ठाणेदार मुकुंद ठाकरे, उपनिरीक्षक संतोष बोयणे, निरंजन उकंडे, प्रकाश तिखिले, संजय गोरे, मोहन महाजन, संतुलाल उईके, सुदर्शन देशमुख, रवींद्र दातीर, नीलेश गडपायले, अशफाकभाई यांचा पोलीस पथकात समावेश होता. दोन वर्षांपूर्वी अंजिराचा पती रामेश्वर उईके बेपत्ता असल्याची तक्रार बेनोडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. आरोपी मनोजसिंग यानेच रामेश्वरला संपविल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)