मुंबई - महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा झाला असला तरी जागावाटपावरून महायुतीत तणाव आहे. मुंबईत भाजपा १३० ते १५० जागा लढवण्यावर ठाम आहे तर शिंदेसेनेलाही १००-१२५ जागा हव्यात आहेत. त्यामुळे महायुतीतील भाजपा आणि शिंदेसेनेत मुंबईत जागांची रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक आहे.
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडणार आहे. मात्र त्याआधी जागावाटपावरून महायुतीत तणाव असल्याचे समोर आले आहे. मुंबईत शिंदेसेनेला कमी तर ठाण्यात भाजपाला कमी जागा देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. त्याशिवाय मुंबईत एकत्र आणि ठाणे, कल्याण डोंबिवलीत वेगळे लढण्याचाही प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत मोठा भाऊ म्हणून भाजपा भूमिका बजावेल तर ठाण्यात शिंदेसेना मोठ्या भावाची भूमिका बजावण्याच्या स्थितीत आहे. कल्याण डोंबिवलीत दोन्ही पक्षाचे प्राबल्य आहे. त्याठिकाणी निवडणुकीच्या निकालानंतर कोणाचा महापौर बसवायचा हे चित्र ठरेल. जागावाटपात रस्सीखेच असल्याने काही प्रमाणात वाद होण्याचीही शक्यता आहे.
तर नवाब मलिक मुंबईत नेतृत्व करणार असतील तर भाजपा राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. त्यामुळे मलिकांसोबत जाण्याचा प्रश्न नाही. मुंबईत भाजपा आणि खरी शिवसेना यांच्यात युती होणार आहे असं भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सांगितले. तर नवाब मलिक यांच्याकडेच नेतृत्व देण्यावर अजित पवारांची राष्ट्रवादी ठाम आहे. आज मलिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे त्यामुळे मुंबईत महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
शिंदेसेना-भाजपाची संयुक्त बैठक
दरम्यान, महायुतीची आज मुंबईतील दादर येथील कार्यालयात संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजपाकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. तर शिंदेसेनेकडून उदय सामंत, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे चर्चा करणार आहेत. भाजपा मुंबईत १५० जागा लढवण्यासाठी आग्रही असून शिंदेसेनेकडून १०० जागांवर लढण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही दिली जात आहे.