खातेवाटपावरून तणातणी
By Admin | Updated: November 2, 2014 02:24 IST2014-11-02T02:24:33+5:302014-11-02T02:24:33+5:30
आपल्याला मनासारखे खाते मिळालेच पाहिजे, असा आग्रह सगळ्याच प्रमुख मंत्र्यांनी धरल्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होऊन एक दिवस उलटला तरीही खातेवाटप होऊ शकलेले नाही.

खातेवाटपावरून तणातणी
भाजपासमोर नवा पेच : प्रमुख मंत्र्यांचा मनासारख्या खात्यासाठी आग्रह
अतुल कुलकर्णी - मुंबई
आपल्याला मनासारखे खाते मिळालेच पाहिजे, असा आग्रह सगळ्याच प्रमुख मंत्र्यांनी धरल्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होऊन एक दिवस उलटला तरीही खातेवाटप होऊ शकलेले नाही. पंकजा मुंडे यांच्यापासून ते एकनाथ खडसे यांच्यार्पयत सगळ्यांचीच नाराजी खातेवाटपावरून समोर आलेली आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिलेल्या खडसे यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती; पण दिल्लीने त्यांना मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे दुस:या नंबरचे स्थान देऊ केले आहे. आपणास गृहखाते सोडून कोणतेही खाते द्या, असे त्यांचे म्हणणो असले तरी महसूलसोबत वित्त खाते मिळावे, असा त्यांचा आग्रह आहे.
शुक्रवारी शपथविधीच्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपणास महिला आणि बालकल्याण खाते देणार असाल तर आपण शपथच घेणार नाही, असा पवित्र घेतल्याचे तेथे असणा:या काही नेत्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खाते मिळावे, असा त्यांचा आग्रह आहे. मंत्रिमंडळातील दुसरे ‘वजनदार’ मंत्री विनोद तावडे यांचा डोळा गृह खात्यावर होता; पण ते मिळत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी नगरविकास खात्याचा आग्रह धरला आहे. प्रकाश महेता यांना गृहनिर्माण खाते दिले जाण्याची शक्यता आहे, तर नगरविकास खाते मुख्यमंत्री फडणवीस स्वत:कडे ठेवणार असल्याने तावडेंचा पुरता हिरमोड झाला आहे.
विदर्भातील सुधीर मुनगंटीवार यांना जलसंपदा किंवा गृह हे खाते दिले जावे, असा आग्रह नितीन गडकरी यांनी धरलेला आहे. वित्त, नगरविकास, सामान्य प्रशासन आणि गृह ही खाती फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.
गृह मुख्यमंत्र्यांकडे, खडसेंना महसूल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण हे दोन विभाग एकत्र करून मनुष्यबळ विकास असे नवे खाते निर्माण करण्यात येणार आहे. विनोद तावडे हे या खात्याचे मंत्री असतील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार, विष्णू सवरा यांना आदिवासी विकास तर पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खाते असेल, असेही विश्वसनीय सूत्रंनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस हे वित्त आणि गृह हे दोन विभाग आपल्याकडेच ठेवतील, असे आधी म्हटले जात होते. पण विदर्भातीलच त्यांचे सहकारी मुनगंटीवार यांच्याकडे त्यांनी वित्त खाते दिले आणि गृह व नगरविकास स्वत:कडे ठेवले.
गृहमंत्रीपदाचे दावेदार असलेले विनोद तावडे यांना शिक्षणाशी संबंधित विविध खाती एकत्र करून मनुष्यबळ विकास खाते देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गिरीष बापट विधानसभा अध्यक्ष ?
पुण्याने सर्वच्या सर्व जागा भाजपाच्या पदरात टाकल्या, पण सर्वात ज्येष्ठ असलेले गिरीष बापट यांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांची नाराजी देखील लपून राहिलेली नाही. त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचे घाटले जात आहे.
ओढाताणीत रखडले खातेवाटप
शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्यानंतर काही खाती त्यांना द्यावी लागतील. त्यामुळे या सगळ्या ओढाताणीत मंत्रिमंडळाचे खातेवाटप रखडले आहे.
खासगी सचिव होण्यासाठी लॉबिंग
जे मंत्री झाले आहेत त्यांच्याकडे खाजगी सचिव होण्यासाठी म्हणून अनेक अधिकारी मोठय़ा प्रमाणावर लॉबिंग करू लागले आहेत. मात्र स्वच्छ प्रतिमेचे खाजगी सचिव आपल्या जवळ असावेत; शिवाय गोपनीयता बाळगणारेही असावेत, यासाठी मंत्र्यांचा शोध चालू आहे.