खारघर टोलनाक्यावर तेंडुलकरचा खोळंबा
By Admin | Updated: February 14, 2015 04:06 IST2015-02-14T04:06:58+5:302015-02-14T04:06:58+5:30
सायन - पनवेल मार्गावरील खारघर टोलनाका हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी ही नवीन समस्या बनली आहे.

खारघर टोलनाक्यावर तेंडुलकरचा खोळंबा
पनवेल : सायन - पनवेल मार्गावरील खारघर टोलनाका हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी ही नवीन समस्या बनली आहे. सकाळी ही कोंडी सुमारे एक ते दीड किमीच्या परिसरात पसरलेली असते. या कोंडीचा फटका सकाळी ९ च्या सुमारास मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसला. या वेळी सुमारे १५ ते २० मिनिटे सचिन या वाहतूक कोंडीमध्ये अडकला.
कामोठे टोलनाक्यावरील टोल प्लाझावर सकाळच्या सुमारास टोल देण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकांना सचिनबाबत समजताच अनेक जण आपल्या कॅमेऱ्यातून सचिनची एक छबी टिपण्यासाठी खाली उतरले, तसेच टोल प्लाझावरील कर्मचारीही सचिनच्या गाडीमागे धावताना दिसत होते. कामोठे टोलनाक्यावर एका गाडीमध्ये सचिन असल्याची माहिती टोल प्रशासनाला मिळताच त्या ठिकाणची वाहतूककोंडी काही वेळातच सोडविली.
टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका भल्याभल्यांना बसत आहे. महिनाभरापूर्वी मराठी सिनेअभिनेता भरत जाधव सुमारे एक तास अडकला होता. आज हा प्रत्यय सचिन तेंडुलकरलाही आला. (प्रतिनिधी)