जागा न सोडणाऱ्या भाडेकरूंना अटक
By Admin | Updated: November 4, 2014 03:25 IST2014-11-04T03:25:05+5:302014-11-04T03:25:05+5:30
धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

जागा न सोडणाऱ्या भाडेकरूंना अटक
मुंबई : हेकेखोरपणाने घर खाली न करून अंधेरी (पू.) येथील एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
न्यायालयात हजर असलेल्या अनिरुद्ध कैलाश शर्मा आणि हेमंत कैलाश शर्मा या दोन भावांना मध्य दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी स्थानबद्ध करून पुन्हा ५ नोव्हेंबरला न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्या. जगदीश सिंग केहार व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने दिला. दरम्यानच्या काळात घर खाली करण्याच्या आदेशाचे पालन करता यावे यासाठी अनिरुद्ध व हेमंतची वयोवृृद्ध आई लता शर्मा हिला या स्थानबद्धतेतून वगळले जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
अंधेरी (पू.) येथील न्यू नागरदास क्रॉस रोडवरील ‘विमला भवन’ ही जुनी इमारत मोडकळीस आली असून, ती खाली करण्याचे आदेश महापालिकेने पूर्वीच दिले आहेत. इमारतीतील १० पैकी ९ भाडेकरूंनी घरे खाली करून पुनर्बांधणीसाठी मे. आदिती बिल्डर्स यांच्याशी करार केले आहेत. लता, अनिरुद्ध व हेमंत शर्मा यांनी त्यांची खोेली खाली न केल्याने पुनर्बांधणी गेली पाच वर्षे रखडली आहे. शर्मा वगळता इतर भाडेकरूंनी केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेने इमारत खाली करण्याच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करावी, असा आदेश देताना शर्मा यांना घर खाली करण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती.
मात्र या मुदतीत घर खाली न करता शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यावर सोमवारी सुनावणी झाली तेव्हा, शर्मा यांनी अद्यापही घर खाली केले नसल्याचे निदर्शनास आल्यावर अनिरुद्ध व हेमंत यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले. या पक्षकारांनी पाच वर्षे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करून इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडवून ठेवले आहे, याविषयी आमची खात्री झाली असल्याचे खंडपीठाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)