उ. प्रदेशातून दहा वर्षांनी गुन्हेगाराला अटक
By Admin | Updated: January 20, 2016 02:40 IST2016-01-20T02:40:15+5:302016-01-20T02:40:15+5:30
अपहरण झालेल्या मुलाच्या मृत्यूचे गूढ तब्बल १० वर्षांनी शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट युनिट -५ ने उघडकीस आणून फरार झालेल्या मुख्य सूत्राला गजाआड केले आहे

उ. प्रदेशातून दहा वर्षांनी गुन्हेगाराला अटक
ठाणे : अपहरण झालेल्या मुलाच्या मृत्यूचे गूढ तब्बल १० वर्षांनी शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट युनिट -५ ने उघडकीस आणून फरार झालेल्या मुख्य सूत्राला गजाआड केले आहे. उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणूक लढवताना झळकलेल्या छायाचित्रामुळे तो पोलिसांच्या सहजच जाळ्यात सापडला. हाजुरीत राहणाऱ्या प्रमोद राममूर्ती गौतम (१६) याचे २००५ मध्ये झालेल्या अपहरणप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तसेच दोन दिवसांनी नारपोली पोलीस ठाण्यात एका अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अपहरणाप्रकरणी पोलिसांनी हाजुरीतील अब्दुल शमी एैश महम्मद चौधरी, महम्मद हमील उर्फ लड्डू अब्बास खान, आणि जलाल उद्दीन जुम्मन खान या तिघांना अटक केली होती. मात्र, अपहरण झालेला मुलगा न सापडल्याने त्यांची सुटका झाली होती. मुख्य सूत्रधार कादीर एैश महम्मद चौधरी हा तेव्हापासून फरार होता. अपघातातील अनोळखी मयताची आणि वाहनाबाबतची माहिती वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. मुलाची ओळख पटवून मुख्य सूत्रधार हा युपीतील सिद्धार्थनगर येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने १५ जानेवारी रोजी आरोपीला अटक केल्यावर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. मयत प्रमोद हा ट्रकवर क्लिनर होता. त्याला ठाण्यातून नाशिककडे घेऊन जाताना तो ट्रकमधून खाली पडला आणि ट्रकखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे मृतदेह साथीदार आणि ट्रक चालकाच्या मदतीने टाकून दिल्याचे सांगितले. या नुसार १० वर्षापूर्वीचे दोन गुन्हे उघडकीस आले. मात्र, त्याचा मृत्यू नक्की कसा झाला, याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)