मुंबई : आपली लबाडी झाकण्यासाठी एका खासगी कंपनीची अधिकारी या नात्याने उभ्या केलेल्या एका तोतया महिलकरवी खोटी प्रतिज्ञापत्रे करून न्यायालयाची दिशाभूल करणा-या आणि न्यायप्रक्रिया कलुषित करणा-या एका ७६ वर्षांच्या पक्षकारास मुंबई उच्च न्यायालयाने ‘कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट’बद्दल दोषी ठरविले असून, १० लाख रुपयांची देणगी देण्याची शिक्षा त्यास ठोठावली आहे.जयवंतीबेन जयरामदास जयसिंग या महिलेचे २६ जानेवारी २००२ रोजी मुंबईत निधन झाले होते. जयवंतीबेन यांनी १३ डिसेंबर १९९७ रोजी मृत्युपत्र करून ठेवले होते व त्यानुसार आपल्या मृत्युपश्चात आपल्या मिळकतीचे व्यवस्थापक म्हणून बन्सी जयसिंग व त्यांचा मुलगा रवि यांची नेमणूक केली होती. हे दोघे मिळकतीची विल्हेवाट नीट ठेवत नाहीत, म्हणून त्यांना काढून इतरांना व्यवस्थापक म्हणून नेमावे, असा अर्ज मृत्युपत्राचे लाभार्थी रमेश जयरामदास जयसिंग व इतरांनी केला होता. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बन्सी जयसिंग यांनी आपण मिळकतीची कशी व्यवस्था ठेवत आहोत, हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र केले. त्यात त्यांनी इतर गोष्टींखेरीज असे सांगितले, की जयवंतीबेन यांनी एचडीएफसी बँकेत ठेवलेली २.२५ कोटी रुपयांची एक मुदत ठेव मोडून आपण ते पैसे इंटरलिआॅन प्रा. लि. या कंपनीत ठेव म्हणून ठेवले आहेत. असे का केले, असे न्यायालयाने विचारले असता बन्सी यांनी सांगितले, की त्या कंपनीचे प्रवर्तक आपले मित्र आहेत व त्यांनी १५ टक्के व्याज देण्याची तयारी दर्शविली म्हणून त्यांच्याकडे पैसे ठेवले. न्यायालयाने हे स्पष्टीकरण अमान्य केले व सर्व रक्कम न्यायालयाच्या प्रोथोनोटरीकडे जमा करण्याचा आदेश दिला.ठरल्या तारखेपर्यंत प्रोथोनोटरीकडे पैसे जमा केले गेले नाहीत. पुढच्या तारखेस बन्सी यांनी इंटरलिआॅन कंपनीच्या मुंबई कार्यालयाच्या प्रमुख या नात्याने सीमा खान या महिलेस न्यायालयापुढे उभे केले. ३५ लाख रुपये त्याच दिवशी आरटीजीएसने जयवंतीबेन यांच्या मिळकतीत जमा केले आहेत व राहिलेली रक्कम प्रोथोनोटरीकडे जमा केली जाईल, असे सीमा खान यांनी सांगितले. परंतु त्यानुसार पैसे जमा केले गेले नाहीत. नंतर पुढील तारखांना गैरहजर राहणाऱ्या बन्सी व सीमा खान यांना वॉरन्ट काढून न्यायालयापुढे आणले गेले. स्वत: बन्सी व सीमा खान यांनी न्यायालयापुढे दिलेली कबुली व इंटरलिआॅन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर एस. पारेख यांनी केलेले प्रतिज्ञापत्र यावरून बन्सी व सीमा खान यांनी केलेली फसवणूक व तोतयेगिरी उघड झाली. वस्तुत: सीमा खान यांचा या कंपनीशी काहीही संबंध नाही. स्वत: अडचणीत आल्यावर कौटुंबिक मैत्रीसंबंध असलेल्या सीमा खान हिला बन्सी यांनी इंटरलिआॅन कंपनीची अधिकारी म्हणून कोर्टापुढे येऊन खोटी विधाने करण्यास भाग पाडले होते. एवढेच नव्हे, तर बन्सी यांनी या कंपनीत २.२५ कोटी रुपये १५ टक्के व्याजाने ठेवलेही नव्हते. (विशेष प्रतिनिधी)
दहा लाख देणगीची शिक्षा
By admin | Updated: February 14, 2015 04:26 IST