ठाण्यात दहा प्रभाग समित्या बिनविरोध

By Admin | Updated: April 30, 2016 03:10 IST2016-04-30T03:10:38+5:302016-04-30T03:10:38+5:30

महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.

Ten Division Committees Unauthorized in Thane | ठाण्यात दहा प्रभाग समित्या बिनविरोध

ठाण्यात दहा प्रभाग समित्या बिनविरोध

ठाणे : महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. या समित्यांवर शिवसेनेने आपले वर्चस्व यंदाही कायम राखले. शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, भाजपा आणि मनसेचे प्रत्येकी एकेक अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. मनसेला शिवसेनेमुळेच एक समिती मिळाली आहे. तर पाच विशेष समित्या शिवसेना आणि भाजपाला राखता आल्या आहेत.
तर निवणूक काळात आयुक्तांशी हुज्जत घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नगरसेविका नंदा पाटील यांचे पती कृष्णा पाटील यांना अटक केली. सहा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी एक-एक अर्ज आला होता. त्यातच माजीवडा-मानपाडा, कोपरी आणि मुंब्रा येथे दोन-दोन अर्ज आल्याने येथे अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता होती. परंतु, निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने त्या समित्यांच्या अध्यक्षांची ही बिनविरोधच झाली.
१० प्रभाग समितीमधील वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी उज्वला फडतरे, रायला देवी प्र.स.अध्यक्षपदी शान मनप्रित गुरूमुख सिंग, वागळे इस्टेट प्र.स.अध्यक्षपदी अश्विनी जगताप , नंदा पाटील (उथळसर), प्राजक्ता खाडे (लोकमान्यनगर, सावरकरनगर) या पाच प्रभाग समितींवर शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकला आहे. तर त्यांचा मित्र पक्ष असलेला भाजपाच्या वाट्याला नौपाडा प्रभाग समिती आली असून येथे भाजपाच्या सुहासिनी लोखंडे यांची निवड झाली आहे. तर कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मनिषा साळवी निवड झाली. तर माजिवडा -मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उषा भोईर आणि शिवसेनेच्या बिंदु मढवी यांचा अर्ज भरला होता. येथे शिवसेनेचे सहा नगरसेवक असून राष्ट्रवादीचे चार, एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. अपक्ष हा राष्ट्रवादीच्याच बाजूने असला तरी काँग्रेसचा एक नगरसेवक म्हणजेच जयनाथ पूर्णेकर यांचे मत येथे निर्णायक मानले जात होते. त्यांच्या मतावरच या समितीचे भवितव्य ठरणार होते. पंरतु, शुक्र वारी मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा भोईर यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या बिंदू मढवी यांची बिनविरोध निवड झाली. तर दुसरीकडे कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने तेथे काँग्रेसच्या मालती पाटील यांनी आणि मनसेतून राजश्री नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनसेला शिवसेनेने पाठींबा दिल्याने ही प्रभाग समिती मनसेच्या वाटेला जाणार असे निश्चित मानले जात होते. येथील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे ३, भाजपा १, मनसे १ असे होते. तर काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादीचे २ असे तीनचे संख्याबळ काँग्रेसच्या बाजूने होते. त्यामुळेच येथे मनसेचा विजय होईल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती दरम्यान शुक्र वारी मतदानाच्या वेळी येथेही काँग्रेसच्या मालती पाटील यांनीही माघार घेतल्याने मनसेच्या राजश्री नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
या समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष्य हे मुंब्रा प्रभाग समितीकडे लागले होते. या समितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही आघाडीच्या मित्र पक्षामध्येच लढत होती. काँग्रेसने रेश्मा पाटील यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने पुन्हा अशरफ उर्फ शानु पठाण यांना उभे केले होते. पण मतदानाच्यावेळी काँग्रेसच्या रेश्मा पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे शानू पठाण यांची बिनविरोध निवड झाली. पाच विशेष समित्यांपैकी गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती - राजकुमार यादव (भाजपा),क्रीडा समिती - काशिनाथ राऊत (शिवसेना), शिक्षण समिती - प्रभा बोरीटकर, आरोग्य समिती - पुजा वाघ आणि महिला बालकल्याण समितीपदी विजया लासे यांची निवड झाली आहे. या निवडणूक अधिकारी म्हणून मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ten Division Committees Unauthorized in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.