दुर्गाडीवरील मंदिराला लवकरच नवी झळाळी
By Admin | Updated: December 26, 2014 04:16 IST2014-12-26T04:16:09+5:302014-12-26T04:16:09+5:30
येथील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवरील दुर्गामाता मंदिराच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेने हिरवा कंदील

दुर्गाडीवरील मंदिराला लवकरच नवी झळाळी
कल्याण : येथील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवरील दुर्गामाता मंदिराच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेने हिरवा कंदील दाखविला आहे. यासंदर्भातल्या प्रस्ताव सूचनेला मान्यता मिळाल्याने लवकरच या मंदिराला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.
किल्ले दुर्गाडीवर दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक किल्ले दुर्गाडीवर येत असतात. कल्याणकरांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या मंदिराची दुरुस्ती सुमारे ४८ वर्षांपूर्वी तत्कालीन कल्याण नगर परिषदेने केली होती. त्यानंतर, अद्यापपर्यंत या मंदिराची दुरुस्ती करण्यात आली नाही. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने मंदिराचा काही भाग ढासळल्याची घटना मध्यंतरी घडली होती. त्यातच, पावसाळ्यात मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती लागल्याने भाविकांची गैरसोय होत होती. नवरात्रोत्सवात दुर्गादेवीच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याची मागणी नगरसेविका समिधा बासरे यांनी केली होती. त्यानुसार, बुधवारच्या महासभेत बासरे आणि महापौर कल्याणी पाटील यांच्याकडून मंदिराच्या दुरुस्तीची आणि मजबुतीकरणाची प्रस्ताव सूचना दाखल करण्यात आली होती. या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिल्याने मंदिराच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)