तांत्रिक मुद्यावर वाया गेला प्रश्नोत्तराचा तास !
By Admin | Updated: July 20, 2016 05:10 IST2016-07-20T05:10:59+5:302016-07-20T05:10:59+5:30
नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या विषयावर सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरु करा, अशी मागणी विरोधकांची होती

तांत्रिक मुद्यावर वाया गेला प्रश्नोत्तराचा तास !
अतुल कुलकर्णी,
मुंबई- नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या विषयावर सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरु करा, अशी मागणी विरोधकांची होती. तर प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून लगेच चर्चा सुरु करा, असा आग्रह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा होता. त्याआधी अध्यक्षांच्या दालनात मॅरेथॉन बैठक पार पडली; पण तोडगा निघालाच नाही, शेवटी या वादात काहीही कामकाज न होता प्रश्नोत्तराचा तास मात्र वाया गेला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज पत्रिकेत कोणतेही कामकाज नव्हते. त्यामुळे सगळे सदस्य साडेबाराला घरी निघून गेले. त्याऐवजी याविषयावर चर्चा झाली असती तर राज्यात चांगला संदेश गेला असता, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत आणि सभागृहात व्यक्त केले. मात्र पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव होता. शोकप्रस्तावानंतर कोणतीही चर्चा होऊ नये, असे संकेत असल्याने काल चर्चा घेतली नाही. कामकाज काहीच नव्हते असे कसे म्हणता असे म्हणत अध्यक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सभागृह सकाळी ११ वाजता सुरु झाले, तेव्हा कोपर्डीवरील चर्चा नेमकी कधी घ्यायची यावर जवळपास २० मिनीटे चर्चा झाली. प्रश्नोत्तराचा तास तहकूब करु नय,े असा आग्रह याआधीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही कायम धरलेला होता ,असा दाखला अध्यक्षांनी दिला; मात्र अपवादात्मक स्थितीत हा तास रद्द करता येतो, असे सांगून वळसे पाटील यांनी अध्यक्ष असताना घेतलेल्या निर्णयाच्या विरुध्द मतप्रदर्शन केले. परिणामी अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटे तहकूब केले. त्यानंतरही तोडगा निघाला नाही; तेव्हा पुन्हा सभागृह १२ वाजेपर्यंत तहकुब केले गेले. परिणामी प्रश्नोत्तराचा तास कोणत्याही चर्चेविना वाया गेला.
मुख्यमंत्र्यांनी कालच कोपर्डी प्रकरणी सविस्तर निवेदन केले होते. त्यामुळे चर्चेअंती मागणी तरी काय करायची, असा प्रश्न विरोधकांपुढे होता. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच मागितला.
मात्र; त्यास ना विरोधकांकडून प्रतिसाद मिळाला ना सत्ताधारी बाकावरुन विरोध झाला. मुख्यमंत्री सभागृहात भाषणे ऐकत असताना मंत्र्यांच्या बाकांवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट वगळता अनेकांची गैरहजेरीही चर्चेचा विषय बनली होती.
>सभागृहात मंत्रीच अनुपस्थित!
सभागृहात मंत्र्यांनी बसलेच पाहिजे, असा फतवा काढूनही मंत्र्यांची आणि सत्ताधारी बाकावरील सदस्यांची अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच रोडावलेली उपस्थिती पाहून संसदीय मंत्री बापट यांनी उद्या बुधवारी सगळ्या सदस्यांची व मंत्र्यांची बैठक विधानभवनात ठेवली आहे. ज्या हॉलमध्ये बैठक होणार आहे त्या हॉलचे दरवाजे सकाळी ९-४५ वाजता बंद होतील, त्यानंतर मंत्री असो की आमदार, कोणालाही आत सोडले जाणार नाही अशी ताकीद देणारे पत्रही राज पुरोहित आणि बापट यांनी सदस्यांना व मंत्र्यांना रवाना केले.