टीम ‘हॅप्पी न्यू ईयर’ होती रडारवर

By Admin | Updated: November 20, 2014 03:43 IST2014-11-20T03:43:28+5:302014-11-20T03:43:28+5:30

निर्माते अली-करिम मोरानी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराचा काहीच फायदा होत नाही हे पाहून गँगस्टर रवी पुजारी अस्वस्थ झाला होता.

The team was 'Happy New Year' on the radar | टीम ‘हॅप्पी न्यू ईयर’ होती रडारवर

टीम ‘हॅप्पी न्यू ईयर’ होती रडारवर

जयेश शिरसाट, मुंबई
निर्माते अली-करिम मोरानी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराचा काहीच फायदा होत नाही हे पाहून गँगस्टर रवी पुजारी अस्वस्थ झाला होता. त्यामुळेच त्याने ‘हॅप्पी न्यू ईयर’च्या टीमलाच लक्ष्य करण्याचे फर्मान जारी केले होते, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते.
गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने पुजारीच्या १३ हस्तकांना नुकतेच गजाआड केले. चौकशीत याच टोळीने मोरानींच्या घरावर गोळीबार केल्याची तर दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येची तयारीही केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. तसेच मोरानी यांच्या घरावर गोळीबार घडविल्यानंतरही त्याचा फारसा परिणाम झाला नाही, परिस्थिती बदलली नाही, त्यामुळे पुजारी अस्वस्थ झाला आणि त्याने हॅप्पी न्यू ईयर चित्रपटाशी संबंधीत कोणालाही लक्ष्य करा, असे आदेश मुंबईत सक्रिय असलेल्या मॉड्युलना दिले होते. त्यातही सुपरस्टार शाहरूख खान, दिग्दर्शिका फराह खान, शाहरूखच्या रेड चिली कंपनीचे कार्यालय ही पुजारीची मुख्य टार्गेट होती, अशी माहिती समोर आल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुजारीने ही जबाबदारी खास हस्तक इशरत बादशहा शेख उर्फ चाचू आणि अनीस मर्चंट या दोघांवर सोपवली होती. या दोघांनी नवख्या, गरजू तरूणांचे तीन ते चार गट तयार केले. या गटांना दिग्दर्शक महेश भटट, ‘हॅप्पी न्यू ईयर’मध्ये अभिनय केलेल्या शाहरूख, फराह आणि रेड चिलीचे कार्यालय येथे रेकीसाठी धाडले. तेथील सुरक्षा व्यवस्था, शाहरूख किंवा फराहचा दिनक्रम वगैरे महत्वाची माहिती काढण्याची जबाबदारी या गटांवर होती. मात्र प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलिसांचा जागता पाहारा असल्याने पुजारीच्या हस्तकांना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.
मुळात या चित्रपटाच्या परदेशी वितरणाचे हक्क पुजारीला हवे होते. त्यासाठी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या बीटटू सिंग नावाच्या इव्हेन्ट मॅनेजरकरवी पुजारीने मोरानी यांना तशी विचारणा केली होती. मात्र मोरानी यांनी त्यास नकार दिल्याने पुजारीने त्यांना धमकावण्यास सुरूवात केली.
पुजारीनेही मोरानी बधत नाहीत हे पाहून त्यांच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता अशी माहिती मिळते. मात्र या गोळीबारानंतरही मोरानी बधले नाहीत, तसेच या घटनेची हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही यामुळे पुजारी सैरभैर झाला. त्याने टीम हॅप्पी न्यू ईयरला टार्गेट करण्याचे आदेश दिले.

Web Title: The team was 'Happy New Year' on the radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.