संघ बौद्धिकाचा पॅटर्न देशभर!
By Admin | Updated: November 28, 2014 02:12 IST2014-11-28T02:12:09+5:302014-11-28T02:12:09+5:30
2 डिसेंबर रोजी संघाने मंत्रिमंडळाचा ‘बौद्धिक’ वर्ग नागपुरात आयोजित केला असून, सरकार्यवाह भैयाजी जोशी मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

संघ बौद्धिकाचा पॅटर्न देशभर!
यदु जोशी - मुंबई
राष्ट्रीय स्वयंसेवक आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाची सुरुवात म्हणून 2 डिसेंबर रोजी संघाने मंत्रिमंडळाचा ‘बौद्धिक’ वर्ग नागपुरात आयोजित केला असून, सरकार्यवाह भैयाजी जोशी मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बौद्धिकातून संघाचे सरकारशी सूर जुळले, तर भाजपाशासित इतर राज्यांमध्येही अशा समन्वय बैठका आयोजित केल्या जातील, असे सूत्रंनी सांगितले.
केंद्र आणि भाजपाशासित राज्य सरकारांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी संघामध्ये क्रमांक 2चे पद भूषविणारे भैयाजी जोशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भाजपाशासित सरकारांवर संघाची पकड यापुढील काळात अधिक मजबूत होईल आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून केली जात असल्याचे मानले जात आहे. भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका माध्यमांतून केली जाते. शिवाय, इतर पक्षातून भाजपात येऊन मंत्री झालेल्यांना संघ विचार आणि संस्कारांची जाणीव नसते. या दोन्ही प्रकारच्या मंत्र्यांना संघाची विचारधारा आणि अपेक्षा याबाबत यापुढे सातत्याने बौद्धिक दिले जाणार आहे. संघविचारचे दूत म्हणून मंत्र्यांनी चारित्र्यसंपन्नच असले पाहिजे, असा संघाचा आग्रह असेल.
याआधी संघ आणि भाजपात समन्वयाचे काम सरकार्यवाह सुरेश सोनी करायचे. लखनौमध्ये अलीकडे झालेल्या संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संघ-भाजपा आणि संघ व सरकार असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले. त्यात संघ-सरकार समन्वयाचे काम भैयाजी जोशी यांच्याकडे तर संघ-भाजपात समन्वयाचे काम उत्तर प्रदेशातील डॉ. कृष्णगोपाल यांच्याकडे सोपविण्यात आले.
सुरेश सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटचे मानले जात होते. संघाकडून करण्यात आलेल्या काही सूचना मोदी यांच्याकडून मानल्या जात नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. त्यातूनच सोनी यांच्याकडील समन्वयाची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यामुळे अशा पदांवर संघाच्या भूमिकेवर ठाम राहणारीच व्यक्ती असली पाहिजे, म्हणूनच सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकार्यवाह जोशी आणि कृष्णगोपाल यांना पसंती दिल्याचे म्हटले जाते.
सरसंघचालकांव्यतिरिक्त संघाच्या इतर पदांची निवडणूक येत्या पाच महिन्यांत होणार आहे. दर तीन वर्षानी ही निवडणूक होत असते. या वेळी पदाधिका:यांमध्ये काही महत्त्वाचे बदल कार्यकारिणीमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.