राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षण पंधरवडा
By Admin | Updated: December 31, 2016 02:56 IST2016-12-31T02:56:37+5:302016-12-31T02:56:37+5:30
प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६

राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षण पंधरवडा
मुंबई : प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.
बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्रत्येक शाळेत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी आणि राज्यातील एकही मुलगी शाळेपासून वंचित राहू नये यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मुलीच्या शिक्षणावर कमी खर्च केला जातो. त्यामुळे अनेकदा मुलींना अर्धवट शाळा सोडावी लागते. असे घडू नये म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी पंधरवड्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे.
शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. त्याचबरोबर परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वैचारिक आणि तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून विद्यार्थिनींची होणारी गळती कमी करण्यासाठीही हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)