शिक्षकांची रिक्त पदे भरलीच पाहिजेत

By Admin | Updated: July 1, 2014 00:53 IST2014-07-01T00:53:53+5:302014-07-01T00:53:53+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबतच राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांत महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे ही मोठी समस्या बनली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने

Teacher's vacancies should be filled | शिक्षकांची रिक्त पदे भरलीच पाहिजेत

शिक्षकांची रिक्त पदे भरलीच पाहिजेत

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबतच राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांत महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे ही मोठी समस्या बनली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. अनुदानित महाविद्यालयांतील सर्व रिक्त पदे सहा महिन्यांच्या आत भरलीच पाहिजेत, असे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली असून, या निर्देशांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.
गुणात्मक महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षणात सुधारणा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उच्चशिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव, उपसचिव, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव यांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीत राज्यातील उच्चशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव इत्यादी मुद्यांवर सखोल विचारदेखील झाला.
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागांवर शिक्षकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यांच्या आत राबविण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले होते. या निर्देशांच्या आधारावर विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट) डॉ. श्रीकांत कोमावार यांनी नागपूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे. महाविद्यालयांना या निर्देशांचे पालन करणे आवश्यकच आहे. जर असे झाले नाही तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher's vacancies should be filled