शिक्षकांनीच घेतला टीईटी परीक्षेचा धसका!
By Admin | Updated: November 3, 2014 04:05 IST2014-11-03T04:05:47+5:302014-11-03T04:05:47+5:30
राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते

शिक्षकांनीच घेतला टीईटी परीक्षेचा धसका!
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी या परीक्षेत सुमारे ९५ टक्के उमेदवार नापास झाल्याने यंदाच्या परीक्षेचा शिक्षकांनी धसका घेतला आहे. गेल्या वर्षी सहा लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच या परीक्षेसाठी अर्ज केला असल्याने शिक्षकांनीच या परीक्षेकडे पाठ फिरवली आहे, असे दिसते़
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचा कार्यक्रम आॅक्टोबरमध्ये जाहीर केला होता. त्यानुसार डी.एड., बी.एड.धारक शिक्षकांना २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार होते. यंदा या परीक्षेसाठी केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच अर्ज केले असून त्यांची परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तर अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांना १ ते १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याची माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी टीईटी परीक्षा १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांपैकी पहिली ते पाचवीसाठीचे ४.४३ टक्के आणि सहावी ते ८ वीसाठीचे केवळ ५.९५ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले होते. तर या परीक्षेत ९५ टक्के शिक्षक नापास झाल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले होते. या परीक्षेनंतर डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक शिक्षक परीक्षेला बसणे अपेक्षित होते. परंतु पहिल्या परीक्षेच्या निकालाचा शिक्षकांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत अधिकाधिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत, यासाठी परीक्षेत विशेष सूट देण्यात आली होती.
तरीही डी.एड., बी.एड. झालेल्या ९५
टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ६० टक्के गुणही मिळविता आले नव्हते. यामुळे यंदाच्या परीक्षेकडे लाखो शिक्षकांनी पाठ फिरवल्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)