अधिवेशनात शिक्षक संघटनांचा हल्लाबोल
By Admin | Updated: December 8, 2014 03:02 IST2014-12-08T03:02:04+5:302014-12-08T03:02:04+5:30
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या शाळांच्या कर्मचारी संच निर्धारणावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊनही

अधिवेशनात शिक्षक संघटनांचा हल्लाबोल
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या शाळांच्या कर्मचारी संच निर्धारणावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊनही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवित आहेत. याच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे शिक्षक संघटनांच्या वतीने हल्लाबोल करण्यात येणार आहे.
संच निर्धारणामुळे राज्यात हजारोंच्या संखेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. तसेच तीन वर्षे सेवा कालावधी पूर्ण न झालेल्या शेकडो शिक्षणसेवकांना सेवामुक्त्त व्हावे लागत आहे. शासनाच्या या शिक्षक व शिक्षण हितविरोधी कृतीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व अन्य संघटनांसह उच्च न्यायालयात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आव्हान दिले. या याचिकेवर उच्च न्यायालयाने शासनाच्या या कृतीला स्थगिती दिली.
मात्र शिक्षणाधिकारी याचा चुकीचा अर्थ काढून शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी बाजू मांडत शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कालबाह्य संच निर्धारणानुसार कारवाई करणे नियमबाह्य असल्याचे विषद केले. संच मान्यतेमध्ये उणिवा असल्यामुळे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणे, शिक्षणसेवकांची सेवा समाप्त करणे बंद करावे, अशी मागणी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. परंतु दुसरीकडे शिक्षणाधिकारी नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचे आदेश देत असल्याने राज्यभर सावळागोंधळ सुरू आहे. या
विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शक्षक संघटनांच्यावतीने हल्लाबोल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)