मुंबई : रात्रशाळा बंद करून मुक्त शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाविरोधात सर्वच शिक्षक संघटनांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. शिक्षक भारतीने या प्रस्तावाविरोधात बॅटरी मोर्चा काढत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर शिक्षक परिषद, टीडीएफ, रात्रशाळा महासंघ व शिक्षक मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन रात्रशाळांच्या समस्यांना वाचा फोडली.शिक्षक संघटनांचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील एकही रात्रशाळा बंद पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. रात्रशाळांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार कपिल पाटील यांनी दिली. दरम्यान शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यात तावडे म्हणाले की, रात्रशाळांच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करून संचमान्यतेत दुरुस्ती करून बदल करण्यात येतील. शिवाय रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. संगणक शिकविण्यासाठी रात्रशाळांना लॅपटॉप पुरविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. केवळ रात्रशाळेतच शिकविणारे शिक्षक अतिरिक्त ठरल्यास, त्यांचे समायोजन जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये करण्यात येईल, असे आश्वासनही तावडे यांनी शिक्षक संघटनांना दिले.मुख्यमंत्र्यांनी दुपारी बैठक घेऊन आश्वासन दिल्यानंतरही शिक्षक भारतीने गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ््याला अभिवादन करून सायंकाळी भर पावसात मोर्चा काढला. मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तारापोरवाला मस्त्यालय येथे मोर्चाला अडवले. त्यानंतर पोलिसांच्या आवाहनाला साद देत आंदोलनकर्त्यांनी तिथेच निदर्शने करत मोर्चा स्थगित केला. (प्रतिनिधी)
रात्रशाळांसाठी शिक्षक संघटना आक्रमक
By admin | Updated: August 2, 2016 05:08 IST