शिक्षक पती-पत्नींचा संसार नावालाच!
By Admin | Updated: October 8, 2015 01:35 IST2015-10-08T01:35:49+5:302015-10-08T01:35:49+5:30
लग्नानंतर १०-१५ वर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्यांचा संसार केवळ नावालाच शिल्लक असतो. राज्यभरातील सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्य बदलीच्या धोरणामुळे हा कटू अनुभव घेत आहेत.

शिक्षक पती-पत्नींचा संसार नावालाच!
- गजानन दिवाण, औरंगाबाद
लग्नानंतर १०-१५ वर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्यांचा संसार केवळ नावालाच शिल्लक असतो. राज्यभरातील सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्य बदलीच्या धोरणामुळे हा कटू अनुभव घेत आहेत. वैयक्तिक आयुष्यच अधुरे असणाऱ्या या शिक्षकांकडून समाज बदलण्याची आशा तरी कशी ठेवायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकाच जिल्ह्यातील पती-पत्नीच्या शाळेतील अंतर ३० कि.मी.पर्यंत असावे, अशी अट आहे, परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यांत कार्यरत दाम्पत्याच्या शाळेतील अंतर किंवा त्यांची निश्चित सेवा झाल्यावर बदली व्हावी, अशी कुठलीही तरतूद नाही. त्याचा फटका राज्यातील सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्यांना बसत आहे. त्यातील अनेक शिक्षक १० ते १५ वर्षे जोडीदारापासून दूर आहेत. त्यांच्या शाळांचे अंतर ९०० कि.मी.पर्यंत आहे. म्हणजेच महिन्यातून एखाद्या वेळीच त्यांची भेट होते. राज्यातील अशा ३८ दाम्पत्यांची यादी ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी व्यथा मांडली.
७, १०, १२ वर्षे झाली त्यांच्या लग्नाला, तरी संसार केवळ नावालाच उरला, अशा स्थितीत त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवणार, असा सवाल शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी उपस्थित केला. सध्याच्या स्थितीत आंतरजिल्हा बदली करवून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी समान जात वर्गाची अट मोठी अडचण ठरत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील शिक्षक तयार असले, तरी त्यांची जात एकच असणे आवश्यक आहे. तसा शिक्षक मिळणे किती कठीण आहे, हे प्रतीक्षा यादीवरील १३ हजार दाम्पत्यांच्या आकड्यावरून लक्षात येते.
मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, हाती काहीच लागले नाही. नियमांमध्ये बदल करावा, म्हणून राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य रोस्टर एकच करण्याची त्यांची मागणी असून, राज्यात सरसकट एकच रोस्टर केल्यास रिक्त जागांवर तातडीने या दाम्पत्यांची वर्णी लागू शकते. सद्य:स्थितीत राज्यात शिक्षकांच्या १७ हजार जागा रिक्त आहेत. त्या भरण्यापूर्वी आंतरजिल्हा बदल्यांचा विषय मार्गी लावल्यास हा प्रश्नही मिटेल आणि नवीन भरतीदेखील करता येईल, अशी अपेक्षा पिट्टलवाड यांनी व्यक्त केली.
त्यांना दिलासा;
यांना मात्र प्रतीक्षा
कौटुंबिक अडचण लक्षात घेता, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांच्या बदल्या अवघ्या दीड वर्षात रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने २८ आॅक्टोबर २०१३ ला घेतला. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या या शिक्षकांची अडचण कोणीच लक्षात घेत नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
मागण्या काय?
आंतरजिल्हा बदली करताना समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार बदली करण्यात यावी.
राज्यातील रिक्त जागांवर प्राधान्याने या दाम्पत्यांचा विचार व्हावा.
संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेत न करता, खासगी संस्थेतील रिक्त पदांवर करण्यात यावे.
भरतीप्रमाणे आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
आंतरजिल्हा बदलीसाठीची पाच वर्षे सेवेची अट रद्द करून तीन वर्षे करावी.
सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्यांना बसत आहे. त्यातील अनेक शिक्षक १० ते १५ वर्षे जोडीदारापासून दूर आहेत.