अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वर्ग त्रस्त
By Admin | Updated: October 9, 2015 02:40 IST2015-10-09T02:40:33+5:302015-10-09T02:40:33+5:30
निवडणुकीच्या कामांतून शिक्षकांना हायकोर्टाने दिलासा दिला असला, तरी शनिवारपासून शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून काम करावे लागणार आहे

अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वर्ग त्रस्त
मुंबई : निवडणुकीच्या कामांतून शिक्षकांना हायकोर्टाने दिलासा दिला असला, तरी शनिवारपासून शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून काम करावे लागणार आहे. परीक्षा तोंडावर आल्या असताना अशा प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष महादेव सुळे म्हणाले की, अध्यापनासोबत शिक्षकांना सरलची माहिती भरणे, पायाभूत चाचणी परीक्षा, मूल्यमापन अशी विविध कामे करावे लागत आहे. त्यात या नव्या उपक्रमात शिक्षकांना नोंदवही अद्ययावत करताना प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक नोंदवून डाटा बेस तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना शाळांमधून महिन्याभराची सुट्टी घ्यावी लागेल.
शासकीय आणि खासगी अशा सर्व शाळांमधील एकापेक्षा
अधिक शिक्षकांचे या कामावरील नियुक्तींचे आदेश काढण्यात आले आहेत. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शाळांतील शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाला एक हजाराहून अधिक व्यक्तींची माहिती
तयार करावी लागणार आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून त्याचा मनस्ताप मुख्याध्यापकांना सोसावा लागणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले. यामुळे शाळेच्या कामांवर परिणाम होत असल्याने शिक्षक त्रासलेले आहेत.