अशैक्षणिक कामांबद्दल शिक्षक आक्रमक
By Admin | Updated: November 17, 2015 01:29 IST2015-11-17T01:29:19+5:302015-11-17T01:29:19+5:30
शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी करत, राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

अशैक्षणिक कामांबद्दल शिक्षक आक्रमक
- विवेक चांदूरकर, वाशिम
शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी करत, राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अशैक्षणिक कामांचाच बोजा जास्त झाल्याची शिक्षकांमधील खदखद अमरावती जिल्ह्यातील एका मुख्याध्यापकाच्या आत्महत्येनंतर बाहेर आली आहे.
शिक्षकांवर लादण्यात येत असलेली कामे क्षमतेपेक्षा जास्त झाली आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असून, त्याचेही खापर शिक्षकांवरच फोडण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने शिक्षण विभाग जिल्हा परिषदेकडे ठेवण्याऐवजी स्वतंत्र विभाग करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. यामध्ये सानेगुरुजी सेवा शिक्षक संघटना, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेसह विविध संघटनांचा समावेश आहे. मागण्या मान्य करण्याकरिता शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.
अशैक्षणिक कामांचा बोजा
शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पुरविणे व त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे
मतदार यादी पुनर्निरीक्षण किंवा त्या संबंधीची कामे
राष्ट्रीय लोकसंख्या यादी अद्यावत करण्याचे काम
गावात स्वच्छता अभियान राबविणे
शासनाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शैक्षणिक धोरण निश्चित करायला हवे. त्यात वेळोवेळी बदल न करता दीर्घकालीन शैक्षणिक धोरण ठरवायला हवे.
- प्रभाकर झोड, राज्य संघटक, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटना