कर वसुलीसाठी पालिका कर्मचारी करदात्यांच्या दारी
By Admin | Updated: November 13, 2016 17:36 IST2016-11-13T17:36:08+5:302016-11-13T17:36:08+5:30
मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील करदात्यांनी थकीत मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रविवारी अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली.

कर वसुलीसाठी पालिका कर्मचारी करदात्यांच्या दारी
राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 13 - मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील करदात्यांनी थकीत मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रविवारी अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. यात त्यांनी कर्मचा-यांना थेट थकीत करदात्यांच्या दारी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश दिले.
पालिकेने गेल्या तीन दिवसांत सुमारे १० कोटी मालमत्ता कर वसुल केला असून, अद्यापही अनेक करदात्यांनी थकीत करासह चालू आर्थिक वर्षातील कर पालिकेत जमा केला नसल्याचे समोर आले आहे. यात मोठ्या थकबाकीदारांचा समावेश अधिक आहे. सकाळी १० ते रात्री, मध्यरात्रीपर्यंत सुरु असलेल्या कर वसुलीला करदाते चांगला प्रतिसाद देत असले तरी अपेक्षित वसुली होत नसल्याचे समोर आले आहे.
सरकारच्या आदेशानुसार या कराच्या वसुलीसाठी जुन्या हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी पालिकेला १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याने हा कर वसुल करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करवसुली सुरू राहणार असल्याने सर्व थकबाकीदारांसह चालू वर्षातील कराचा अद्याप भरणा न केलेल्यांनी कर जमा करण्यासाठी, त्यांना आवाहनाच्या माध्यमातून प्रवृत्त करण्याचे निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार त्यांनी रविवारी पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची बैठक बोलावून त्यात कर्मचा-यांनी थेट थकबाकीदारांच्या दारी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या थकबाकीदारांना वरिष्ठ अधिका-यांद्वारे दूरध्वनी व मोबाईलवर संपर्क साधण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार सकाळपासुनच पालिका अधिकारी व कर्मचारी करदात्यांना संपर्क साधण्यात व्यस्त झाले असून करवसुलीचा आकडा अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत आयुक्त डॉ. नरेश गीते म्हणाले, माझ्यासह वरिष्ठ अधिकारी थकबाकीदारांना फोनद्वारे संपर्क साधत असून कर्मचारी व कनिष्ठ अधिकारी, अभियंते करदात्यांना कर जमा करण्याचे आवाहन करीत आहेत. याला यश येत असून काही तासांतच तीन कोटी कर जमा झाला आहे.