एसटी महामंडळाला सवलतींचा फटका
By Admin | Updated: August 20, 2015 01:09 IST2015-08-20T01:09:20+5:302015-08-20T01:09:20+5:30
विविध सामाजिक घटकांना एसटीच्या बस प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. यात राज्य शासनाच्या आठ विभागांचा समावेश असून, त्यांच्याकडून सवलतींचे २0१४-१५ मधील तब्बल

एसटी महामंडळाला सवलतींचा फटका
मुंबई : विविध सामाजिक घटकांना एसटीच्या बस प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. यात राज्य शासनाच्या आठ विभागांचा समावेश असून, त्यांच्याकडून सवलतींचे २0१४-१५ मधील तब्बल १ हजार ३४१ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या एसटीला दुष्काळात तेरावा महिना भोगावा लागत आहे. यामध्ये सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची सर्वाधिक सवलत मूल्य असल्याचे सांगण्यात आले.
एसटीकडून २४ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात. ही सवलत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागांना देण्यात येते. या सवलती दिल्यानंतरही त्याची प्रतिपूर्ती कोणत्याच विभागाकडून अद्यापही करण्यात आलेली नाही. शासनाच्या आठही विभागांकडून २0१४-१५ मध्ये १ हजार ३४१ कोटी ५८ लाख ९६ हजार ३७४ रुपये सवलतीचे मूल्य देण्यात आलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यात सामाजिक न्याय विभाग आघाडीवर असून, या विभागाकडून ६९८ कोटी ३0 लाख ५७ हजार २९६ रुपये एसटीला येणे बाकी आहे. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नंबर लागत असून, या विभागाकडून ४२२ कोटी ४६ लाख ९३ हजार ७३१ रुपये येणे असल्याचे सांगण्यात आले. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडूनही २१८ कोटी २४ लाख ८७ हजार ३११ रुपये अद्याप आलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांत आठही विभागांकडून सवलतींच्या मूल्याची प्रतिपूर्ती करण्यात आलेली नसल्यानेच ही थकबाकी वाढत गेली आहे.