‘टाटा’च्या झटक्यातून सावरण्यास ‘बेस्ट’चे खासदारांना साकडे

By Admin | Updated: May 22, 2014 05:01 IST2014-05-22T05:01:36+5:302014-05-22T05:01:36+5:30

वीजपुरवठा करणार्‍या टाटा वीज कंपनीला मुंबई शहरातही वीजपुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर या झटक्यातून सावरण्यासाठी बेस्ट आता थेट नवनिर्वाचित खासदारांना साकडे घालणार आहे.

Taste the MPs of 'Best' | ‘टाटा’च्या झटक्यातून सावरण्यास ‘बेस्ट’चे खासदारांना साकडे

‘टाटा’च्या झटक्यातून सावरण्यास ‘बेस्ट’चे खासदारांना साकडे

मुंबई : उपनगरांत वीजपुरवठा करणार्‍या टाटा वीज कंपनीला मुंबई शहरातही वीजपुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर या झटक्यातून सावरण्यासाठी बेस्ट आता थेट नवनिर्वाचित खासदारांना साकडे घालणार आहे. टाटाला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी बेस्टच्या वतीने खासदारांना करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्‍या बेस्टच्या क्षेत्रात टाटा पॉवरला वीज वितरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने बेस्टच्या महागड्या वीजदरांपासून दक्षिण मुंबईतील ग्राहकांची सुटका होणार आहे. मात्र, आपल्याकडील ग्राहक टाटाकडे वर्ग होऊ नयेत, यासाठी बेस्ट प्रयत्नशील आहे. मुळात बेस्टचा वाहतूक विभाग पूर्णत: आर्थिक संकटात आहे. बेस्टचे अनेक मार्ग तोट्यात आहेत. परिणामी, बेस्टचा डोलारा सर्वार्थाने वीजक्षेत्रावर अवलंबून आहे. बुधवारी या संकटातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट समितीच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान टाटा पॉवरला मिळालेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित खासदारांना करण्यात येणार असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतून महायुतीचे सहा खासदार नुकतेच दिल्लीत निवडून गेले आहेत. या खासदारांना बेस्टच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आहे. त्यामुळे या खासदारांच्या माध्यमातून बेस्टला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय, खासदारांना पत्र देऊन बेस्टच्या विद्युत विभागाबाबत माहिती देण्यात येईल, असेही दुधवडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Taste the MPs of 'Best'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.