मुंबई : एक दिवसाचा संप करून सरकारला रिक्त पदे भरण्याची मागणी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था (आयटीआय) आणि तंत्रशाळा कर्मचाऱ्यांनी नुकतीच केली. मात्र शासनाने त्याची योग्य दखल न घेतल्याने कर्मचारी बेमुदत संपाच्या तयारीत आहेत. रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन ती तातडीने भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.राज्यात ४१७ शासकीय आयटीआय आणि १६९ तंत्रशाळा असून त्यात लिपिक, निदेशक आणि चतुर्थ श्रेणी संवर्गाची सुमारे २ हजार पदे रिक्त आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने २००६ साली रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यात मुख्य लिपिक व अधीक्षक पदांना मंजुरी दिली. मात्र मंजुरी दिलेल्या पदांपैकी ५५० रिक्त पदांवर भरती करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता प्रशासन पदे भरण्यात चालढकल करीत असल्याचा आरोप व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कर्मचारी संघटनेचे प्रमुख सल्लागार अ. द. कुलकर्णी यांनी केला आहे.शासनाने आयटीआय आणि तंत्रशाळांसाठी कोट्यवधी रुपय खर्च करून अत्याधुनिक यंत्रे विकत घेतली आहेत. मात्र ही यंत्रे हाताळण्यासाठी आवश्यक निदेशक संख्याच प्रशासनाकडे नसल्याचा गंभीर आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. शिवाय कार्यरत निदेशकांना आधुनिक यंत्र हाताळणीचे प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रे आयटीआय आणि शाळांत धूळखात पडली आहेत. या यंत्रांसाठी शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात असून, विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण पुरवण्यात संस्था कमी पडत आहेत. परिणामी निदेशकांची रिक्त पदे भरून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे.एक दिवसाचा लाक्षणिक संप केल्यानंतर शासन स्तरावर चर्चा करण्यास संघटना तयार आहे. मात्र १२ आॅगस्टपर्यंत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, तर १३ आॅगस्टला राज्यातील आयटीआय आणि तंत्रशाळांतील ११ हजार कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षक मुंबईतील मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. शिवाय त्यानंतरही तोडगा निघाला नाही, तर ११ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, अशी माहिती संघटनेने दिली. (प्रतिनिधी)
तंत्रशाळा कर्मचारी संपाच्या पवित्र्यात
By admin | Updated: July 28, 2014 04:08 IST