दोन मृतदेहांसह तवेरा जीप सापडली

By Admin | Updated: August 15, 2016 06:32 IST2016-08-15T05:00:43+5:302016-08-15T06:32:57+5:30

सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या तिन्ही बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात नौदलाला यश आले आहे.

Tara Jeep was found along with two bodies | दोन मृतदेहांसह तवेरा जीप सापडली

दोन मृतदेहांसह तवेरा जीप सापडली


महाड /दासगाव : सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या तिन्ही बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात नौदलाला यश आले आहे. तब्बल अकराव्या दिवशी रविवारी दुपारी घटनेच्या ठिकाणापासून चारशे मीटर अंतरावर तवेरा जीप शोधपथकाने नदीबाहेर काढली. यात दोन मृतदेह होते. आता एकूण सापडलेल्या मृतदेहांची संख्या २८ झाली आहे.
दुर्घटनेच्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावर तीन दिवसांपूर्वी राजापूर-बोरीवली एसटी बस बाहेर काढण्यात आली होती; तर शनिवारी १२ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पाचशे मीटर अंतरावर जयगड-मुंबई एसटी बसचा सांगडा बाहेर काढण्यात यश आले होते. तिन्ही बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात यंत्रणेला यश आल्याने एनडीआरएफ, नौदल, सागरी तटरक्षक दल यांची शोधमोहीम थांबण्याची शक्यता आहे. तथापि, वाहनांचा तपास लागला असला तरी अद्याप १३ बेपत्ता व्यक्तींचा शोध लागलेला नाही.
रविवारी सापडलेल्या तवेरामध्ये दोन मृतदेह आढळून आले. हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला. तब्बल १३ दिवस मृतदेह पाण्यात राहिल्याने हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. त्यांना हाताळणे कठीण असल्याने प्रशासनाने त्याच ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले होते. मृतांचे नातलग उपस्थित असल्याने ओळख पटवून घेण्यात आली. दत्ताराम मिरगल आणि संतोष वाझे अशी त्यांची नावे आहेत. त्यानंतर महाड ट्रॉमा केअरमध्ये या दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.
तवेरा गाडीत ९ प्रवासी होते. यापैकी घटनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कारमधील शेवंती सखाराम मिरगल, संपदा संतोष वाझे, दिनेश सखाराम कांबळे, रमेश सखाराम मिरगल या चार जणांचे मृतदेह सापडले होते. तर संतोष वाझे, आदिनाथ कांबळी, जयंत मिरगल, दत्ताराम मिरगल आणि कारचा चालक दिलीप वीर हे बेपत्ता होते. रविवारी दत्ताराम मिरगल आणि संतोष वाझे या दोघांचे मृतदेह सापडले. मात्र कारचालकासह तीनजण अद्याप बेपत्ता आहेत. (प्रतिनिधी)
।शोधकार्यात स्थानिकांची महत्त्वपूर्ण मदत
येथील प्रशासनाला कायम पूर परिस्थितीसोबत सामना करण्याची माहिती आहे. सावित्री नदीला आलेल्या पुराचे पाणी प्रतिवर्षी शहरामध्ये शिरते. यावर्षी मात्र सावित्रीचे रौद्ररूप ]पाहावयास मिळाले. सावित्री आणि काळ या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो, या संगमापासून काही मीटर अंतरावरच ही दुर्घटना घडली. दुर्घटना घडल्यापासून महाडमधील प्रथम अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, नंदकुमार सस्ते आदींनी शोधकार्य तसेच मदतकार्यामध्ये अथक मेहनत घेतली आहे. मृतदेह सापडल्यानंतर वैद्यकीय सेवा पुरविण्यामध्ये महाड ट्रॉमा केअरचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, डॉ. सुभाष राठी, डॉ. समृध्द येरुणकर, किशोर मराठे यांच्या पथकाने १३ व्या दिवसांपर्यंत दिवस-रात्र काम केले. या संपूर्ण दुर्घटनेमध्ये महाडमधील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी, कृषी विभाग, ग्रामसेवक, तलाठी, स्थानिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, वाळू व्यावसायिक यांनी दाखविलेला मोलाचा सहभाग न विसरण्यासारखा आहे.
>या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा दोन महिन्यांत शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करून वारसांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्याच्या धोरणानुसार व्यक्ती बेपत्ता होऊन ७ वर्षांचा कालावधी झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांना शासकीय मदत मिळते. परंतु संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून वारसांना मदत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
महाड दुर्घटनेत बुडालेल्या एसटीमधील प्रवासी, वाहक व चालक यांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी १० लाख रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून ४ लाख रुपये अशी एकूण १४ लाख रुपये एवढी मदत तर इतर खासगी वाहनांतील प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री निधीतून ६ लाख असे एकूण १० लाख रुपये एवढी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Tara Jeep was found along with two bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.