गंगारामबुवा कवठेकर यांना तमाशा जीवनगौरव
By Admin | Updated: February 13, 2016 01:50 IST2016-02-13T01:50:14+5:302016-02-13T01:50:14+5:30
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्कार गंगारामबुवा कवठेकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घोषित केले.

गंगारामबुवा कवठेकर यांना तमाशा जीवनगौरव
मुंबई : तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्कार गंगारामबुवा कवठेकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घोषित केले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रतिवर्षी तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
तावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक ११ जानेवारी २०१६ रोजी घेण्यात आली होती. या बैठकीत कवठेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. ५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे प्रदान मागील वर्षीच्या पुरस्कारप्राप्त भिमाभाऊ सांगवीकर यांच्या हस्ते २० फेब्रुवारी २०१६ रोजी वाशी येथे आयोजित तमाशा महोत्सवात करण्यात येईल. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा सदस्य राजन विचारे, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे, विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
उत्कृष्ट ढोलकीपटू, विनोद सम्राट (सोंगाड्या) म्हणून कवठेकर लोकप्रिय आहेत. हार्मोनियम, संबळ, ताशा वादन व नृत्यकाम हे बालपणापासून करणाऱ्या कवठेकर यांचा १९५२-१९८७ पर्यंत स्वत:चा फड होता. गंगारामबुवा कवठेकरांनी १९५२ नंतर वामनराव मोरे (पिंपळगावकर) यांच्या सहाय्याने व गावच्या बहुमोल सहकार्याच्या जोरावर फड चालविला. (प्रतिनिधी)