शिवसेनेशी बोलणी यशस्वी होतील - देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

By Admin | Updated: November 22, 2014 15:43 IST2014-11-22T15:41:19+5:302014-11-22T15:43:47+5:30

राज्यातील सत्ता सहभागाबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून लवकरच यात यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Talks with Shiv Sena will be successful - Devendra Fadnavis expressed confidence | शिवसेनेशी बोलणी यशस्वी होतील - देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेनेशी बोलणी यशस्वी होतील - देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २२ - राज्यातील सत्ता सहभागाबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून लवकरच यात यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेनेशी आमची जुनी मैत्री आहे आणि भविष्यातही दोन्ही पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध कायम राहतील, असेही ते म्हणाले. नवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 
भाजपा नेतृत्वाने शिवसेनेशी जुळवून घेत सर्वांत जुन्या मित्रपक्षासोबत पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना असो वा पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, भाजपाने आपल्या सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवून रालोआला बळकट बनविण्याचे ठरविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे विधान अतिशय महत्वाचे मानले जात आहे. भाजपा व शिवसेनेदरम्यान आरएसएस कोणतीही मध्यस्थी करत नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. 
या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीने भाजपाला दिलेल्या अप्रत्यक्ष पाठिंब्यावरही उत्तर दिले. ते म्हणाले राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादीने आम्हाला आपणहूनबिनशर्त पाठिंबा दिला होता.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्याबाबतही फडणवीस यांनी मत व्यक्त केले. गेल्या २२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी जितकी टीका ऐकली नाही, त्याहून जास्त टीका मला विश्वासदर्शक ठरावानंतर पुढे तीन दिवस सहन करावी लागली असे त्यांनी सांगितले. मात्र आवाजी मतदानाने मंजूर झालेला ठराव हा वैध होता असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली.  महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक म्हणजे मी केजरीवाल यांच्याप्रमाणे पळ काढू शकलो असतो किंवा स्वत:वर विश्वास ठेऊन आहे त्या परिस्थितीला सामोरा गेलो असतो. मी दुसरा पर्याय निवडला. माझ्या शब्दांपक्षा माझं काम जास्त बोलेल, याचा मला विश्वास होता असेही त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
 

Web Title: Talks with Shiv Sena will be successful - Devendra Fadnavis expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.