कर्जमाफीसाठी मोदींशी चर्चा
By Admin | Updated: May 7, 2017 04:29 IST2017-05-07T04:29:20+5:302017-05-07T04:29:20+5:30
‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या

कर्जमाफीसाठी मोदींशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या दाहकतेची जाणीव मी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून करून दिली आहे. उत्तरप्रदेशाप्रमाणे संपूर्ण देशातही कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांना केली आहे. बघू या.. आता पुढं काय होतंय ते,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.
पवार हे पुस्तकांचे गाव भिलार येथे मुक्कामी आले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘कर्जमाफीची घोषणा मोदींनी उत्तरप्रदेशामध्ये केली. त्यांची घोषणा संपूर्ण देशाला लागू पडते. कर्जमाफी केली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाईट सवय लागेल, असा आरोप होत असेल तर मग उत्तरप्रदेशामध्ये कशी काय कर्जमाफी केली? मग आम्ही काय भारताबाहेर आहे काय?
राष्ट्रपतीपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी पुन्हा एकदा मी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना आणि डाव्या चळवळीतील लोकांना उमेदवार हवा म्हणून त्यांनी माझे नाव पुढे केले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मतांची बेरीज यात खूप मोठा फरक आहे. देशभरातील मतांची आकडेवारी लक्षात घेतली असता त्यांना पंधरा हजार मते कमी आहेत. विरोधी पक्ष एकत्र नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही मते मिळविणे फार अवघड नाही. ममता बॅनर्जी आणि डावे एकत्र येऊ शकत नाहीत. मात्र राष्ट्रपती पदासाठी एकमताने निर्णय होऊ शकतो आणि असे नाव एकमताने पुढे येऊ शकते, असेही पवार म्हणाले.
काँग्रेस- राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्षयात्रेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी खूप दिवसांनी चांगल्या प्रश्नांवर एकत्र आली. त्याचा मला आनंद आहे. सरकारविरोधी जनमत तयार करण्याचा यानिमित्ताने चांगला प्रयत्न झाला, असेही पवार म्हणाले.
मोदी वर्कोहोलिक... पण एकट्याने निर्णय घेणारे
अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी सामूहिकपणे काम करत टीमवर्क केले तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच खूप काम करतात. काही माणसे अल्कोहोलिक असतात, तसे मोदी हे वर्कोहोलिक आहेत.
‘छत्रपतींची गादी असलेल्या साताऱ्याबद्दल मी काय बोलावे? याक्षणी एवढेच सांगू इच्छितो की, राजकीय नेत्यांनी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींची शहानिशा करण्याचे तारतम्य बाळगावे. नसते उद्योग करणारी मंडळी सोबत असली की, प्रकरण अंगलट येते,’