तळीरामांचे परवाने रद्द
By Admin | Updated: April 13, 2015 11:39 IST2015-04-13T05:35:23+5:302015-04-13T11:39:49+5:30
दारू पिऊन वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा असूनदेखील तो नियम वाहनचालकांकडून मोडला जातो. अशा वाहन चालकांविरोधात २0१४ मध्ये मुंबई वाहतूक

तळीरामांचे परवाने रद्द
मुंबई : दारू पिऊन वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा असूनदेखील तो नियम वाहनचालकांकडून मोडला जातो. अशा वाहन चालकांविरोधात २0१४ मध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ हजार ५४१ केसेस पकडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यातील २ हजार ९८९ तळीरामांना दारू पिऊन वाहन चालविणे चांगलेच महागात पडले असून, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामांचा सर्वाधिक समावेश असतो. या तळीरामांना दंड करतानाच त्यांना जेलचीही हवा खावी लागते. तरीही अशा चालकांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. २0१४ मध्ये तळीराम चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एकूण १५ हजार ५४१ केसेस दाखल करण्यात आल्या असून, यातील २ हजार ९८९ जणांचे लायसन्स कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहेत, तर २२ जणांना वॉरंट बजावण्यात आले. महत्त्वाची बाब ४ हजार ३३३ तळीरामांना कारावासही भोगावा लागल्याचे सांगण्यात आले. कारवास भोगतानाच त्यांच्यावर दंडही लादण्यात आला असून, त्यांच्याकडून ८८ लाख ३ हजार ६00 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.