‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...

By Admin | Updated: August 27, 2014 01:01 IST2014-08-27T01:01:26+5:302014-08-27T01:01:26+5:30

डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श गजर...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष...आणि काही नेत्यांवरचा राग व्यक्त करताना

'Take you to Marbat ... | ‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...

‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...

अच्छे दिन कधी येणार ?
नागपूर : डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श गजर...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष...आणि काही नेत्यांवरचा राग व्यक्त करताना त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या बडग्यांना चपलांनी मारण्याचे सुख अनुभवत आजचा मारबत उत्सव रंगला. तब्बल १३३ वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारी ही परंपरा आहे. केवळ नागपुरातच काढण्यात येणाऱ्या या मारबत उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला राग आणि संताप व्यक्त होत होता. सामान्य माणसांना व्यक्त होण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत नाही, पण मारबत उत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांना त्यांच्या पद्धतीने अभिव्यक्त होण्याची संधी देणारा हा लोकोत्सव लोकांच्या प्रचंड प्रतिसादाने गाजला. प्रचंड गर्दी, उंट, घोडे, संदल, वाजंत्रीच्या तालावर नृत्याचा आनंद घेत प्रामुख्याने युवकांनी या उत्सवात लक्षणीय सहभाग घेतला.
या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे. १८८१ साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला.
त्यानंतर भोसले घराण्याला वाईट दिवसांना सामोरे जावे लागले म्हणून बकाबाईच्या नावाने काळी मारबत काढण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त होताना यात बडग्या उत्सवालाही प्रारंभ झाला.
पाडव्याचा सण साजरा करताना अनेक मंडळांनी आपल्या मनातील संताप व्यक्त करताना तब्बल १७ बडग्यांच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर आपला आक्रोश व्यक्त केला. यात पाकिस्तान आणि चीनची घुसखोरी, पाकिस्तानचा सीमाभागात होणाऱ्या गोळीबाराचा निषेध, जनतेवर बुरे दिन लादणारी सरकार, वेगळ्या विदर्भाच्या नावाने जनतेशी दगा करणारे नेते, विदर्भद्रोही लोक, बलात्कारी बाबा, आसाराम बापूंच्या कृत्याचा निषेध, देशाचे नुकसान करून भ्रष्टाचार करणारे दहशतवादी नेते आदींचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी विविध बडग्यांवर अनेक फलक लिहून काही वाक्ये लिहिण्यात आली होती. एकूणच केवळ नागपूरकरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील नागरिकही या उत्सवासाठी खास नागपुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीने हा उत्सव रंगला.
कश्मीर मांगेगे तो चिर देंगे
स्थानिक पातळीवरच्या समस्यांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या समस्याही संपाव्यात म्हणून यंदा मारबत उत्सवात उत्साहाचे वातावरण होते. मारबत उत्सवाच्या मिरवणुकीत दुसराच बडगा नवाज शरीफ यांचा होता. पाकिस्तानच्या दोगल्या नीतीवर आणि नवाज शरीफ यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत त्यांचा निषेध व्यक्त करणारा हा बडगा चांगलाच चर्चेत राहिला. या बडग्यावर ‘दुध मांगेगे तो खिर देंगे, कश्मीर मांगेगे तो चिर देंगे, अब की बात शेर की सरकार, वजूद मिटा देंगे तेरा पाकिस्तान’ अशा ओळी लिहिल्या होत्या. पाकिस्तानबद्दलचा रोष या बडग्यातून जनतेने व्यक्त केला. हा बडग्या छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने काढण्यात आला होता.
बुवाबाजी करणाऱ्यांविरुद्ध बडगा
बुवाबाजी करून सामान्य जनतेला फसविणाऱ्या बुवांबद्दल निषेध व्यक्त करताना युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाने आसाराम बापू आणि त्यांच्या बलात्कारी पुत्राचा बडगा काढला. त्यावर ‘मै बलात्कारी हुं,मुझे चप्पलसे मारो’, असे लिहिले होते. आसाराम बापूंनी त्यांच्या भाविकांची श्रद्धा तोडली. यामुळे त्यांच्याविरुद्धचा संतापही या बडग्यातून व्यक्त करण्यात आला. प्रतिकात्मक संदेश देणारे काही फलक यावर लिहिले होते. बुवाबाजी करून सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या अशा बुवांना चपलांनी मारण्यात यावे, अशी सूचना त्यावर करण्यात आली होती.
जनतेशी धोका करणाऱ्यांचा बडग्या
अनेक पक्षांच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देत सत्तेत स्थान मिळविले. प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर त्यांना विदर्भाच्या मुद्याचा आणि विकासाचाही विसरच पडला. त्याचा संताप बडग्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर दोन बडगे काढण्यात आले. यातील एका बडग्यावर ‘जो कर दे देश की बरबादी वही है आतंकवादी...’ आणि विदर्भातील नेत्यांना जोडे मारून त्यांची जागा दाखवा, असे आवाहन करणारे फलक होते. केवळ बंदुकांनी लोकांचा जीव घेणारेच दहशतवादी नसून विदर्भातील जनतेच्या भावनांशी खेळणारे नेतेही दहशतवादीच आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन करणारे फलक त्यावर लावण्यात आले होते. तर दुसऱ्या एका बडग्यावर ‘वेगळ्या विदर्भाच्या नावाने धोकेबाजी करणाऱ्या विदर्भवाद्यांना घेऊन जा ऽऽ गे मारबत’ असेही आवाहन करण्यात आले. हा बडगा विदर्भ क्रांती दल बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने काढण्यात आला होता.
नरेंद्र मोदी यांचा निषेध करणारा बडगा
नरेंद्र मोदी यांनी ‘अब अच्छे दिन आनेवाले है’ असे सांगतानाच देशभरातील जनतेला आश्वासन देत सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर अद्यापही महागाई नियंत्रणात आली नाही. महागाई वाढल्याबद्दल आणि महागाईवर नियंत्रण आणण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा संताप प्रामुख्याने यावेळी व्यक्त करण्यात आला. या बडग्यावर ‘बुरे दिन लाने वाले मोदी सरकारला घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा लिहिली होती. सामान्य माणसाचा संघर्ष आणि रोजीरोटीचा प्रश्न सुटलाच नाही, पण महागाईने दोनवेळचे जेवणही दुरापास्त झाले आहे. मोदी सरकारला त्यांचे आश्वासन पूर्ण न करता आल्याचा संताप जाहीरपणे या बडग्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदी यांचा बडगा यावेळी सर्वांच्याच आकर्षणाचा मुद्दा झाला.
काळे धन कोठीघरातून बाहेर काढा
काळा पैसा देशाबाहेरच्या बँकेत ठेवला असल्याची ओरड होत असली तरी त्यात अर्थ नाही. धनदांडग्यांनी प्रचंड प्रमाणात काळा पैसा आपापल्या कोठीघरात लपवून ठेवला आहे. हा काळा पैसा जरी बाहेर आला तरी देशाची स्थिती सुधारू शकते, असा आशय असणारा बडग्या बालमित्र बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने काढण्यात आला. यावर ‘अपने अपने कोठी जाओ, काला धन वापस लावो’, अशी घोषणा लिहिली होती.

Web Title: 'Take you to Marbat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.