कल्याण ग्रोथ सेंटरसाठी प्रीमिअरची जागा घ्या
By Admin | Updated: May 21, 2016 03:35 IST2016-05-21T03:35:13+5:302016-05-21T03:35:13+5:30
: कल्याण ग्रोथ सेंटर म्हणजे नक्की काय, हे आधी सांगा आणि मगच ते विकसित करा.

कल्याण ग्रोथ सेंटरसाठी प्रीमिअरची जागा घ्या
कल्याण : कल्याण ग्रोथ सेंटर म्हणजे नक्की काय, हे आधी सांगा आणि मगच ते विकसित करा. ग्रोथ सेंटरला मनसेचा विरोध नाही. ग्रोथ सेंटरसाठी १० गावांतील गावकऱ्यांच्या जागा घेण्याऐवजी बंद पडलेल्या प्रीमिअर कंपनीच्या जागेवर ग्रोथ सेंटर विकसित करावे, अशी मागणी शुक्रवारी मनसेने केली.
मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर व गटनेते मंदार हळबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. १० गावांत ग्रोथ सेंटरसाठी १०८९ हेक्टर जागेपैकी पहिल्या टप्प्यात ३३० हेक्टर विकसित केले जाणार आहे. पण, ग्रोथ सेंटर म्हणजे नक्की काय, हे १० गावांना अद्याप समजलेले नाही. ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे का, ग्रोथ सेंटरमुळे गावकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे का, त्यांना खरोखरच रोजगार मिळणार आहे का, मल्टीनॅशनल कंपन्या आणि सेवाक्षेत्रातील कंपन्यांत भूमिपुत्रांना सामावून घेतले जाणार आहे का, हे सेंटर व्यवसायाभिमुख नसेल तर त्याचा स्थानिकांना काय उपयोग होणार, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. (प्रतिनिधी)
।बाधितांना रेडी रेकनरच्या चार पट मोबदला द्या
मुख्यमंत्र्यांनी ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून एक लाख हातांना रोजगार देण्याचे घोषित केले होते. ग्रोथ सेंटरसाठी १० गावकऱ्यांच्या जागा घेण्याऐवजी २७ गावांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या प्रीमिअर कंपनीची जागा घेऊन तेथे ग्रोथ सेंटर उभे करावे आणि ग्रोथ सेंटरच्या मॉडेलचा नमुना दाखवावा,
अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ग्रोथ सेंटरमध्ये बाधित होणाऱ्या १०० मीटरच्या रस्त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात ५० टक्के भूखंड देण्यात यावा, बाधितांना रेडी रेकनरच्या दराच्या चार पट मोबदला मिळावा, गावांसाठी एमएमआरडीएने विशेष निधी द्यावा, अशा मागण्याही भोईर, हळबे यांनी पत्रात केल्या आहेत. एमएमआरडीएचे कार्यालय या १० गावांच्या हद्दीत असावे. गुरचरण जागांचाही मोबदला देण्यात यावा, असे त्यांनी सुचवले आहे.