अपघात करणाऱ्यांचा मोबाइल नंबर घ्या-हायकोर्ट
By Admin | Updated: May 14, 2015 02:29 IST2015-05-14T02:29:31+5:302015-05-14T02:29:31+5:30
अपघातातील चालक व मालक सापडत नसल्याने सुमारे दोन हजार दावे अपघात दावा न्यायाधिकरणासमोर प्रलंबित असल्याची दखल घेत उच्च

अपघात करणाऱ्यांचा मोबाइल नंबर घ्या-हायकोर्ट
मुंबई : अपघातातील चालक व मालक सापडत नसल्याने सुमारे दोन हजार दावे अपघात दावा न्यायाधिकरणासमोर प्रलंबित असल्याची दखल घेत उच्च न्यायालयाने अपघात करणाऱ्यांचे मोबाइल नंबर घेऊन ठेवा, अशी सूचना राज्य शासनाला केली आहे. न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाने ही सूचना केली असून, यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमामध्ये तशी दुरुस्ती करणार की नाही, याचे प्रत्युत्तरही सादर करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.
एका सामाजिक कार्यकर्त्याने यासाठी याचिका केली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, २५८ (८) अंतर्गत अपघात करणाऱ्या चालकाची माहिती पोलीस घेतात. यासाठी त्यांना एक फॉर्म दिला जातो. त्यात चालकाच्या घराच्या पत्त्याची नोंद करून घेतली जाते. असे असूनही चालक व मालक सापडत नसल्याने अपघात दावा न्यायालयात तब्बल दोन हजार दावे प्रलंबित आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या याचिकेवर न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात अतिरिक्त सरकारी वकील दिनेश खैरे यांनी राज्यात नोंदणी झालेल्या वाहनांची माहिती न्यायालयाला दिली. २००६ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाकडे आहे. मात्र त्याआधी नोंदणी झालेल्या वाहनांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची माहिती पुढील सुनावणी न्यायालयात सादर केली जाईल, असे अॅड. खैरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर खंडपीठाने अपघात करणाऱ्याचे नाव व पत्ताच सध्या पोलीस घेतात. मात्र तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे. अपघात करणाऱ्याचा किंवा गाडीमालकाचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी व आधार कार्डही पोलिसांनी घेऊन ठेवावे. याने अपघात दावा न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत. (प्रतिनिधी)