जैतापूर गुजरातला न्या!
By Admin | Updated: March 10, 2015 01:54 IST2015-03-10T01:54:30+5:302015-03-10T01:54:30+5:30
महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातमध्ये प्रकल्प सुरु करण्याचे निमंत्रण देणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी कोकणातील जैतापूरचा

जैतापूर गुजरातला न्या!
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातमध्ये प्रकल्प सुरु करण्याचे निमंत्रण देणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी कोकणातील जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प गुजरातला घेऊन जावा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. आतापर्यंत महाराष्ट्र त्याग करीत आला आहे आता हाही त्याग करील, असा टोलाही त्यांनी लगावला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री व आमदार यांची बैठक बोलावली होती. ते म्हणाले, राज्याला लागणारी वीज जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पातून मिळाली तर हा राक्षसी प्रकल्प महाराष्ट्राने आपल्या डोक्यावर का घ्यायचा हे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे घेऊन जावा व महाराष्ट्राला लागणारी वीज द्यावी.
केंद्राच्या भूसंपादन विधेयकावर शिवसेनेने काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. खासगी शिक्षण संस्था, हॉस्पिटल यांना भूसंपादनाकरिता सवलती मिळता कामा नये, असे शिवसेनेचे मत असल्याचे सांगून ते म्हणाले की, ज्यांच्या जमिनी संपादीत करण्यात येतील, त्यांना विश्वासात घ्यायचे नाही व त्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही या तरतुदी रद्द झाल्या पाहिजेत हे शिवसेनेचे ठाम मत आहे. (विशेष प्रतिनिधी)