अपघातमुक्तीसाठी पुढाकार घ्या
By Admin | Updated: August 15, 2016 01:10 IST2016-08-15T01:10:21+5:302016-08-15T01:10:21+5:30
अपघाताचे आणि प्रदूषणाचे प्रमाण पुण्यात खूप जास्त आहे. दर वर्षी देशात ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये ३ लाख लोक मृत्यू जातात.

अपघातमुक्तीसाठी पुढाकार घ्या
पुणे : अपघाताचे आणि प्रदूषणाचे प्रमाण पुण्यात खूप जास्त आहे. दर वर्षी देशात ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये ३ लाख लोक मृत्यू जातात. देशातील अपघात होणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सीआरएफला देण्यात आलेल्या ६ हजार कोटी रुपयांच्या निधीमधील १० टक्के तरतूद ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी खर्च केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुण्याला अपघात आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
अनिल शिरोळे यांनी गेल्या दोन वर्षांत खासदार म्हणून केलेल्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, संघटनमंत्री रवी भुसारी, खासदार संजय काकडे, अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘‘मी लहानपणी माझ्या पुण्यातील बहिणीकडे यायचो त्या वेळी इथे खूप सुंदर हवा होती. कालांतराने पुणे वेगाने वाढत चालले आहे. मात्र, पुण्याचे पुणेपण हरवता कामा नये. देशात रस्त्यांच्या दुतर्फा १२ लाख किलोमीटर झाडे लावली जाणार आहेत. त्यामुळे सर्व रस्ते ग्रीन झाल्याचे चित्र लवकरच पाहायला मिळेल. पुढील ५ वर्षांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी पुणे विभागामध्ये १ लाख कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल. पावसाचे ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जात आहे, हे पाणी अडविण्यासाठी २८ प्रकल्पांची उभारणी येत्या काही दिवसांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येईल.’’ पुण्याच्या मागच्या खासदारांचे नाव स्कँडलमध्ये आले होते; मात्र अनिल शिरोळेंचे नाव त्यांच्या आयुष्यात कधीही अशा कुठल्या गैरव्यवहारात येणार नाही. गेल्या २५ वर्षांत झाले नाही ते येत्या ५ वर्षांत करून दाखवतील, अशी ग्वाही या वेळी गडकरी यांनी दिली.
प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘शहरातून सर्व खासदार, आमदार भाजपाचे निवडून आले आहेत, आता पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. गेल्या २ वर्षांत चांगली कामे झाली आहेत.’’ गिरीश बापट यांनी विचार व्यक्त केले. अनिल शिरोळे यांनी प्रास्ताविक केले.
>निवडून आल्यावर बदलू नका
माजी पंतप्रधान अटलबिहारी यांची आठवण सांगताना दानवे म्हणाले, ‘‘आम्ही नव्याने खासदार म्हणून निवडून गेलो होतो, त्या वेळी अटलजींनी आमची कार्यशाळा घेतली होती. त्यांनी सांगितले होते, ‘निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये बदल करू नका, अगदी केसांचा भांगही बदलू नका, तुमच्या नेहमीच्या व्यवहारात बदल करू नका. नाहीतर निवडून आल्यावर हा बदलला, असा समज जनतेचा होतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर खूपच जबाबदारीने वागावे लागते.’’
>महापौरांनी दिले निवेदन
महापौर प्रशांत जगताप यांनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे भेट घेऊन पुण्याच्या प्रश्नांबाबत निवेदन दिले. केंद्राकडे प्रलंबित असलेले मेट्रो, नदी सुधारप्रकल्प, चांदणी चौक उड्डाणपूल, कात्रज चौक विकसित करणे, सुस रोड उड्डाणपूल आदी प्रकल्प वेगाने मार्गी लागावेत, अशी विनंती त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.